वसई – तमिळनाडूचे युवा आणि क्रीडामंत्री आणि द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलीन यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका कार्यक्रमात स्टॅलीन यांनी सनातन धर्माविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे.
चेन्नई येथे तमिळनाडू प्रगतीशील लेखक व कलाकार संघ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात तमिळनाडूचे क्रीडा आणि युवामंत्री उदयनिधी स्टॅलीन यांनी सनातन धर्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यामुळे वाद निर्माण झाला होता. याबाबत विश्व हिंदू परिषदेचे भाईंदर जिल्हामंत्री नागनाथ कांबळे यांनी मीरा रोड पोलीस ठाण्यात स्टॅलीन यांच्याविरोधात तक्रार दिली होती. सनातन धर्माची तुलना करोना विषाणूबरोबर केल्याने भावना दुखावल्याचे या तक्रारीत म्हटले होते. त्यावरून पोलिसांनी प्राप्त झालेल्या अर्जावर कायदेशीर पडताळणी केल्यानंतर उदयनिधी स्टॅलीन यांच्याविरोधात कलम २९५ (अ) १५३(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आम्ही गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जाईल, असे मीरा रोडचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुल पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा – चंद्रपूर : जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र शिंदे यांचा राजीनामा एकमताने मंजूर
उदयनिधी स्टॅलीन हे द्रमुकचे नेते करुणानिधी यांचे नातू असून त्यांचे वडील एम.के. स्टॅलीन हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री असून उदयनिधी हे सरकारमध्ये युवा कल्याण आणि खेळमंत्री आहेत. अभिनेता आणि चित्रपट निर्माता असलेले उदयनिधी स्टॅलीन हे द्रमुकचे युवा नेते म्हणून ओळखले जातात.
या वादग्रस्त वक्तव्यानंतर उदयनिधी यांचा शिरच्छेद करणाऱ्याला दहा कोटींचे बक्षीस देण्याचे अयोध्येतील एका धार्मिक नेत्याने जाहीर केले. तर अन्य एका संस्थेने त्यांना मारहाण केल्यास १० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.