वसई: टेलिग्रामवर वेगवेगळ्या प्रकारचे टास्क पूर्ण करण्याचे आमिष दाखून वसईत एका इसमाला सायबर भामट्यांनी तब्बल ८४ लाखांचा गंडा घातला आहे. जगातील हॉटेलांचे नामांकन (रेटींग) केल्यास घरबसल्या पैसे मिळतील असे आमिष दाखविण्यात आले होते. फिर्यादीने तब्बल ८५ लाख भरल्यानंतर केवळ १८ हजार परत मिळाले होते.
५९ वर्षीय फिर्यादी हे वसई पश्चिमेच्या सागरशेत येथे राहतात. एप्रिल महिन्यात त्यांना जान्हवी पटेल नामक महिलेचा फोन आला होता. घर बसल्या कमवा (वर्क फ्रॉम होम) ची ऑफर या महिलेने दिली. ट्रिवॅगो कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन जगभरातील वेगवेगळ्या हॉटेल्सना नामांकन (रेंटीग) दिले तर पैसे मिळतील असे सांगण्यात आले.
हेही वाचा… नयना महंत हत्याप्रकरणी ६२२ पानांचे दोषारोपपत्र, मोहरीचे रोप आणि बादलीतील पाणी महत्वाचा पुरावा
२८ नामांकन केल्यानंतर प्रत्येक नामांकनानंतर ९३० रुपये घरबसल्या मिळतील असे आमिष दाखविण्यात आले. त्यानंतर फिर्यादी यांना डिलक्स रेटींग, व्हीआयपी चॅनल फी, आयकर शुल्क फी अशा विविध कारणांसाठी आधी पैसे भरावे लागतील असे सांगितले. फिर्यादीने सायबर भामट्यांनी ३२ बॅंक खाते दिले होते. त्यानुसार एकूण ४३ वेळी फिर्यादी या खात्यांवर ८३ लाख ९५ हजार रुपये वर्ग केली. त्यातून फिर्यादीला केवळ १८ हजार ३३० रूपये परत मिळाले. साधारण ८ महिने हा फसवणुकीचा व्यवहार सुरू होता. नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने वसई पोलीस ठाणे गाठले
वसई पोलिसांनी या तक्रारीवरून फसवणूकीच्या कलम ४२०, ३४ अन्वये फोन करणारी जान्हवी पटेल नामक महिला तसेच दोन टेलिग्रामधारकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.