वसई – विरारमध्ये १७ वर्षीय मुलाने आपल्या आईची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. सोनाली घोगरा (३६) असे या महिलेचे नाव असून ती देपवली ग्रामपंचायतीमध्ये सदस्य होती. मांडवी पोलिसांनी विधिसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली आहे. मुलाला व्यसन असल्याने तो सतत आईकडे पैशांची मागणी करत होता. त्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
विरार पूर्वेच्या देपवली गावात रविवारी रात्री सोनाली घोगरा (३६) या महिलेवर अज्ञात व्यक्तीने चाकूने वार केले होते. तिला उपचारासाठी सुरवातीला भिवंडी येथील रुग्णालयात आणि नंतर ठाण्याच्या कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी रात्री तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मांडवी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून ३ जणांना ताब्यात घेतले होते. मात्र चौकशीमध्ये ही हत्या मृत महिलेच्या १७ वर्षीय मुलाने केल्याचे उघड झाले आहे. आम्ही तिच्या मुलाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. त्याचे पैशांच्या वादातून आईशी वाद व्हायचे. त्याला व्यसनदेखील होते. या वादातून त्याने ही हत्या केल्याची माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी दिली.
हेही वाचा – भाईंदरच्या सहा गावांचा पर्यटन विकास कागदावरच; निधी उपलब्ध असूनही एमएमआरडीएचे अपयश
हेही वाचा – वसई : पोलीस पुत्राचे कारनामे, ‘एआय’चा वापर करून तरुणींची अश्लील छायाचित्रे तयार केलीत
मृत सोनाली घोगरा या देपवली ग्रामपंचायतीच्या सदस्या होत्या. आम्ही मृत महिलेचा मुलाला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिली.