वसई : एका अल्पवयीन मुलीला विरारच्या अर्नाळा येथील लॉजमध्ये तब्बल १७ दिवस डांबून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने या मुलीची सुटका करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तिघांना अटक केली आहे.
पीडित मुलगी १५ वर्षांची असून ती वसईत राहते. तिची ओळख लक्ष्मण शेट्टी याच्यासोबत झाली होती. शेट्टीने तिला १ नोव्हेंबर रोजी विरारच्या अर्नाळा येथील सी साइट नावाच्या लॉजिंगमध्ये फूस लावून आणले आणि तिला बळजबरीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. यानंतर लक्ष्मण पसार झाला. लॉजचालक आकाश गुप्ता आणि कर्मचारी सुशांत पुजारी या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला व कोंडून ठेवले. शुक्रवारी तिने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे शाम शिंदे यांचा नंबर मिळवून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ या लॉजवर छापा टाकून तिची सुटका केली.