वसई – विवाहविषयक संकेतस्थळावर तरुणींची वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक आणि शारीरिक फसवणूक होत असते. आता फसवणुकीच्या या प्रकारामध्ये नायजेरिन भामट्यांनीदेखील प्रवेश केला आहे. विवाहविषयक संकेतस्थळावर भारतीय तरुणाच्या नावाने बनावट खाते तयार करून तरुणींची आर्थिक फसवणूक केली जात आहे. अशा प्रकारच्या दोन घटना नुकत्याच उघडकीस आल्या आहेत.
नालासोपारार्यात राहणार्या ३२ वर्षीय तरुणीने गुप्ता समाजाच्या विवाहविषयक संकेतस्थळावर (मॅट्रीमोनिअल साईट) विवाहासाठी नोंदणी केली होती. तिला अंकुर गुप्ता नावाच्या अमेरिकेतील तरुणाने प्रतिसाद दिला. अमेरिकेत गलेलठ्ठ पगाराची नोकरी असून भारतात येणार असल्याचे सांगून त्याने तरुणीचा विश्वास संपादन केला. यानंतर त्याने मी दिल्लीमध्ये असून माझ्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त सामान असून ते विमानतळावर अडकलं आहे असे सांगितले. भारतात माझे कार्ड चालत नसल्याची थाप मारून त्याने या तरुणीकडे अडीच लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार तिने सुरवातीला ४३ हजार ५५३ आणि नंतर ५० हजार असे एकूण ९३ हजार ५५३ रुपये त्याला ऑनलाईन ट्रान्सफर केले. त्यानंतर हा अंकुर गुप्ता नावाचा भामटा आपले प्रोफाईल डिलीट करून फरार झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून तुळींज पोलिसांन या भामट्याविरोधात फसवणुकीाच गुन्हा दाखल केला.
हेही वाचा – वसई: पोलिसांच्या ताब्यातून आरोपी फरार
तपासामध्ये हा आरोपी भारतीय नसून नायजेरियन नागरिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा प्रकारे तरुणींची आर्थिक फसवणूक करण्याची ही नवीन कार्यपद्धती असल्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर पाटील यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वीदेखील विरारमध्ये एका तरुणीला अशाच प्रकारे २८ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता.