वसई- ‘देव तारी त्याला कोण मारी’ असं म्हटलं जातं. त्याचा प्रत्यय बुधवारी सकाळी वसईत आला. एका खाजगी कंपनीच्या (ओला) वाहनचालकाने रस्त्यात खेळत असलेल्या एका ६ वर्षाच्या मुलाच्या अंगावरून गाडी नेली. या भीषण मुलगा या अपघातातून बचावला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलाच्या अंगावर निर्दयपणे गाडी चालवणारा वाहन चालक अपघातानंतर न थांबता फरार झाला आहे. वालीव पोलीस या चालकाचा शोध घेत आहेत.
वसई पूर्वेच्या वालीव येथील नाईक पाडा येथे बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. येथील एका इसमाने ओला ॲप वरून खासगी वाहन ( एम एच ०१ ईएम ३२४५) बुक केले होते. गाडी आल्यावर प्रवासी त्यात बसला. चालकाने गाडी सुरू केली. त्याचवेळी समोरील मोकळ्या जागेवर राघव कुमार चव्हाण (६) हा चिमुकला खेळत होता. मात्र ओला चालकाने बेदरकारपणे त्याच्या अंगावरून गाडी नेली. चाकाखाली मुलगा आल्याचे लक्षात आल्यानंतरही गाडीचालक थांबला नाही आणि भरधाव वेगाने पुढे निघून गेला. काही अंतर गाडीने त्याला फरफटत नेले. गाडी अंगावर जाऊनही मुलगा आश्चर्यकारकरित्या बचावला आणि उभा राहिला. मात्र तो गंभीर जखमी झाला. त्याला वालीव येथील वालवादेवी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्या पाठीला १४ आणि कपाळावर ९ टाके आले आहेत याशिवाय पायाला दुखापत झाली आहे. या संपूर्ण अपघाताचे चित्रण सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहे. आम्ही ओला चालकाचा नंबर शोधून त्याला फोन केला मात्र त्याने जे करायचं ते करून घ्या असं उत्तर दिल्याचे जखमी मुलाच्या आईने सांगितले. अपघातानंतर तेथे उपस्थितांनी चालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र चालक न थांबता भरधाव वेगाने निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
हेही वाचा >>>वसई : अनधिकृत जाहिरात फलकांना चाप; कारवाईसाठी पथकांची स्थापना, फलकांवर क्विक रिस्पॉंड कोड
हा चालक या घटनेनंतर फरार झाला आहे. आम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी चालकाचा शोध घेत आहोत, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आशुतोष चव्हाण यांनी दिली.