वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा (लक्झरी क्रुझचा) आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई-भाईंदर खाडीत सुरू असलेल्या रोरो सेवेअंतर्गत मेजवानी बोट सफर शनिवारपासून सुरू करण्यात आली आहे. आमदार क्षितीज ठाकूर यांच्या हस्ते या पार्टी क्रुझचं शानदार सोहळ्यात शुभारंभ करण्यात आला. एक तासांच्या या सफरीत नृत्य, संगीताच्या तालावर समुद्र सफरीचा आनंद घेता येणार आहे.
वसई आणि भाईंदर खाडी दरम्यान फेब्रुवारी महिन्यापासून रोरो सेवा सुरू करण्यात आली होती. सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्विसेस प्रा. लि. यांच्या मार्फत चालवल्या जाणार्या या रोरो सेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. वसईहून भाईंदरमार्गे मुंबईला जाणे सोपे झाल्याने नागरिक रोरो सेवेला पसंदी देत आहे. या प्रतिसादामुळे आता महाराष्ट्र सागरी मंडळाने (मेरीटाईम बोर्डाने) खाडीत आरामदायी पार्टी क्रुझ सुरू करण्यास परवानगी दिली आहे. शनिवारी संध्याकाळी नालासोपार्याचे आमदार क्षितीज ठाकूर यांच्या हस्ते या फेरी की सवारीचा शुभारंभ करण्यात आला. सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्विसेस कंपनीतर्फे ‘फेरी की सवारी’ या नावाने पार्टी क्रुझ सुरू झाली आहे. या पार्टी क्रुझमुळे वसईच्या पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास आमदार क्षितीज ठाकूर यांनी व्यक्त केला. यावेळी माजी स्थायी समिती सभापती अफीफ शेख, माजी नगरसेवक हार्दीक राऊत, ऋषित दवे, प्रितेश पाटील, यशोधन ठाकूर, आशिष वर्तक, सनी मोसेकर आदी उपस्थित होते. टॉम ब्रदर्सतर्फे या पार्टी क्रुझचं व्यवस्थापन केले जाणार आहे.
हेही वाचा – आईने घातलेल्या भावनिक सादेमुळे माघार; निवडणूक लढवणार नाही – राजीव पाटील
अशी आहे ‘फेरी की सवारी’
या पार्टी क्रुझबाबत माहिती देताना संचालिका सुयशा तांबोरे यांनी सांगितले की, वाढदिवस, कोटुंबिक सोहळे, मेजवान्या आदींसाठी ही ‘पार्टी क्रुझ’ तयार करण्यात आली आहे. दिवसातून या फेरी की सवारीच्या एकूण तीन फेर्या असणार आहे. संध्याकाळी भाईंदरवर ४ ते ५ या कालावधीत एक फेरी असेल. तर वसई ते भाईंदर अशी संध्याकाळी ५:३० ते ६:३० आणि ६:३० ते ७:३० अशा दोन फेर्या असतील. प्रत्येक फेरी ही १ तासांची असेल. या पार्टी क्रुझ मध्ये एकूण तीन भाग आहेत. खालील भाग (लो डेस्क) दिडशे रुपये प्रति माणसी ठेवण्यात आला आहे. मधला डेस्क हा कुटुंबासाठी (फॅमिली सेक्शन) आहे. त्यात प्रत्येक ४ जणांसाठी १८०० रुपयांचा दर आहे. ज्यात ३०० रुपयांचा स्नॅक्स दिला जाणार आहे. वरील भाग हा प्रिमियर डेस्क आहे. ज्यात ४०० रुपये प्रति व्यक्ती असा दर आहे. ज्यामध्ये प्रत्येकाला १०० रुपयांचे स्नॅक्स दिले जाणार आहे. ज्याला पूर्ण डेस्क हवा असेल त्याला २५ माणसांचे आगाऊ नोंदणी करावी लागणार आहे. या मेजवानी बोटीत संगीत, डिजे, नृत्य आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे.
हेही वाचा – शहरबात: आदिवासींच्या ‘सत्याग्रह’ने प्रशासन जागरूक
रात्री ८ नंतर तरंगते रेस्टॉरंट
फेरी की सवारीच्या ३ फेर्या झाल्यानंतर रात्री भाईंदरच्या किनार्यावर तरंगते रेस्टॉरंट (फ्लोटिंग रेस्टॉरंट) सुरू केले जाणार आहे. रात्री ८ ते ११ अशा वेळेत समुद्रात नागरिकांना जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. त्यात मेजवानी आणि सोहळे देखील आयोजित केले जाणार आहे. वसईच्या किनारपट्टीवर निसर्ग, चविष्ट माशांची मेजवानी आहे. मात्र गोव्याप्रमाणे आरामदायी बोट (लक्झरी) सेवा नाही. त्यामुळे आम्ही ही फेरी की सवारी सुरू केली आहे, अत्यंत किफायतशीर अशी ही सेवा असून सर्वसामान्य माणसांना त्याचे दर परवडतील असे संचालक अभय आणि तेजस तामोरे यांनी सांगितले.