वसई – दादरमध्ये अंगावर झाडाची फांदी कोसळून जखमी झालेल्या वसईतील रोमिल्डा डिसोजा या शिक्षिकेवर हिंदुजा रुग्णालयातील अतिदक्षता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत त्यांच्या पाठीचे मज्जारज्जू तुटले असून त्यांच्या उपचारासाठी किमान २५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. पालिकेच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप कटुंबियांनी केला आहे.

वसईच्या गिरीज गावात राहणार्‍या रोमिल्डा डिसोजा (३५) या मुंबईच्या प्रभादेवी येथील कॉन्हेन्ट गर्ल्स हायस्कूल या शाळेत शिक्षिका आहेत. २५ सप्टेंबर रोजी सकाळी त्या नेहमीप्रमाणे शाळेत जात होत्या. दादरच्या विसावा हॉटेलसमोरून त्या जात असताना एका ट्रकने झाडाला धडक दिली. त्यावेळी झाडाची फांदी तुटुन रोमेल्डा यांच्या अंगावर पडली. सुमारे पाऊण तास त्या फांदी खाली अडकून पडल्या होत्या. अग्निशमन विभागाने त्यांची सुटका केली. रोमिल्डा यांच्यावर सध्या हिंदुजा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या अपघात त्यांच्या मणक्याचे मज्जारज्जू तुटले आहेत. त्यासाठी किमान २५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

हेही वाचा – अजित पवारांच्या निर्णयानंतर शरद पवारांना सर्व बंधूंनी काय सांगितलं? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

हेही वाचा – पांडुरंगाची कार्तिकीची महापूजा कोण करणार? दोन उपमुख्यमंत्री असल्याने मंदिर समितीसमोर पेच

रोमिल्डा यांना ९ वर्षांची मुलगी असून पती नुकतेच आखाती देशातून परतले आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्या या अपघातातून पुन्हा चालू शकतील की नाही याचीदेखील शाश्वती नाही. माझ्या बहिणीला लवकर बरं वाटावे यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आम्ही देवाकडे प्रार्थना करत आहोत, असे रोमिल्डा यांची बहीण शीन लोपीस यांनी सांगितले. पालिकेने धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी केली नाही, तसेच ट्रकचालक बेदरकारपणे ट्रक चालवत होता. त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. पालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांवर आणि ट्रक चालकावर कारवाई व्हावी, अशी मागणी डिसोजा यांच्या कुटुंबियांनी केली आहे.

Story img Loader