वसई- आरती यादव हत्या प्रकरणात आचोेळे पोलिसांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. रोहीत यादव याने जीव ठार मारण्याची धमकी दिल्याची माहिती आरतीने पोलिसांना दिली होती. मात्र पोलिसांनी तिची तक्रार गांभिर्याने घेतली नाही, असा आरोप मयत आरती यादवची बहिण सानियाने केला आहे. आचोळे पोलिसांनी मात्र या आरोपांचा इन्कार केला आहे. आम्ही आरोपीविरोधात अदखलपात्र (एनसी) गुन्हा दाखल करून त्याला समज दिली होती, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
नालासोपार्यात राहणार्या आरती यादव (२२) या तरुणीची मंगळवार सकाळी तिचा प्रियकर रोहीत यादव (२९) याने भर रस्त्यात लोखंडी पान्याने १६ वार करून हत्या केली होती. दिवसाढवळ्या भर रस्त्यात झालेली हत्या आणि तिला वाचविण्याऐवजी जमाव चित्रफित बनवत असल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. मात्र मयत आरतीची बहिण सानियाने पोलिसांच्या कार्यपध्दतीला दोष दिला आहे. रोहीतने तिला त्रास देत होता. तिचा मोबाईल तोडला होता. शनिवारी देखील आरतीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु पोलिसांनी तिची तक्रार गांभिर्याने घेतली नाही. रोहीत मला मारेल असे आरतीने पोलिसांना सांगितले होते. परंतु पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला आणि त्याला समज देऊन सोडून दिले असे तिने सांगितले. पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई केली असती तर माझी बहिण वाचली असती, असा आरोप तिने केला.