कल्पेश भोईर
वसई : विरार येथील मारंबळपाडा परिसर निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यावर भर दिला जाऊ लागला आहे. त्यासाठी कांदळवन विभागाकडून हालचालींना वेग आला असून कांदळवन माहिती केंद्र उभारणी, फेरी बोटिंग चाचणी अशा विविध प्रकारची कामे सुरू करण्यात आली आहेत.
कांदळवनाचे संवर्धन व यासह स्थानिकांना यातून रोजगारनिर्मिती व्हावी या अनुषंगाने विरार येथील मारंबळपाडा निसर्ग पर्यटन म्हणून विकसित करण्यात येत आहे. शासनाच्या कांदळवन विभागाच्या कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना हे अंतर्गत प्रकल्प राबविण्यात येत आहे. विरारचा मारंबळपाडा जेट्टीचा परिसरात विविध प्रजातींचे कांदळवन आहे. या कांदळवनांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. याशिवाय या भागातील नागरिकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध झाले पाहिजे.
यासाठी मागील काही महिन्यांपूर्वी कांदळवन विभागाने येथील नागरिकांची प्रशिक्षण कार्यशाळा घेतली होती. यात त्यांना कांदळवन संवर्धन व या कांदळवनाच्या क्षेत्रात वन पर्यटन क्षेत्र कसे तयार होईल याची माहिती दिली होती. यानुसारच आता या भागात पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या भागातील निसर्ग पर्यटन व येथील कांदळवनांच्या प्रजाती व संपूर्ण परिसराची माहिती पर्यटकांना मिळावी यासाठी माहिती केंद्र उभारणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याशिवाय खाडी मार्गातून परिसराचे निसर्ग पर्यटन करता यावे यासाठी फेरी बोट तयार करण्यात आली आहे. या फेरी बोटीची नुकतीच प्राथमिक चाचणीही घेण्यात आली असल्याचे कांदळवन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मंजिरी केळुस्कर यांनी सांगितले आहे. तसेच इतर जी काही कामे आहेत ती लवकर पूर्ण करून येत्या काही महिन्यांत पर्यटकांसाठी हे खुले करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे पर्यटकांना ही या भागातील निसर्ग अनुभव घेता येणार आहे, तर येथील स्थानिकांनाही रोजगाराची चांगली संधी उपलब्ध होणार आहे.
माहिती केंद्र
विरारच्या मारंबळपाडा जेट्टीवर कांदळवन विभागाकडून माहिती केंद्र तयार करण्यात येत आहे. तयार करण्यात येत असलेल्या माहिती केंद्रात मारंबळपाडा परिसराची ओळख, स्थानिक पक्षी व या भागात आश्रयाला येणारे पक्षी, जलचर प्राणी व त्यांची अन्नसाखळी, विविध कांदळवन प्रजातींची माहिती, या उपक्रमाच्या अंतर्गत सुरू केलेली मत्स्यशेती, तसेच कचरा व इतर प्लास्टिक यापासून कांदळवनांचे कसे संवर्धन करता येईल. अशा सर्व प्रकारची माहिती या केंद्रात पर्यटकांना मिळणार असल्याचे प्रकल्प विभाग समन्वयक तेजश्री तिघळे यांनी सांगितले आहे. याशिवाय बोटिंग करताना त्या त्या भागात आढळून येणारे प्राणी पक्षी यांची माहिती दिली जाणार आहे.
विरारच्या मारंबळपाडा येथे कांदळवन विभागातर्फे पर्यटनस्थळ विकसित करण्याचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत बहुतांश काम पूर्ण झाले आहे. आता जी काही कामे पर्यटनाच्या दृष्टीने बाकी आहेत ती टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येत आहेत. – मंजिरी केळुस्कर, वनपरिक्षेत्र अधिकारी कांदळवन विभाग