वसई- पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या कुटुंबियाच्या दुचाकीचा अपघात झाला. या दुर्घटनेत आईच्या मांडीवर असेलल्या ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. भाईंदर येथे शनिवारी दुपारी ही दुर्घटना घडली. दक्ष शहा असे या अपघातात मरण पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
कुणाल शहा हे पत्नी जिग्ना आणि कियरा (५) तसेच दक्ष (११ महिने) या दोन मुलांसह बाबुदा रेसिडेन्सी येथे राहतात. शनिवारी त्यांची पत्नी जिग्ना हिचा वाढदिवस होता. भाईंदर पश्चिमेच्या गोराई समुद्रकिनार्यावरील रिसॉर्टमध्ये सहकुटुंब वाढदिवस साजरा करण्याचे त्यांनी ठरवले. भाईंदरवरून गोराई जवळच असल्याने त्यांनी दुचाकीवरून जाण्याचे ठरवले. त्यानुसार संध्याकाळी ४ वाजता कुणाल शहा यांच्या ॲक्टीव्हा या दुचाकीवरून चौघे निघाले. कुणाल शहा ॲक्टीव्हा चालवत होते. ५ वर्षांची कियरा पुढे होती तर ११ महिन्यांचा दक्ष मागे बसलेल्या आईच्या मांडीवर होता. ते उत्तन रोड येथील सुरभी हॉटेल जवळून जात असताना रस्त्यावरील साचलेल्या पाण्यामुळे त्यांची दुचाकी घसरली. यामुळे आईच्या हातून दक्ष खाली फेकला गेला आणि त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. डोक्याला मार लागल्याने चिमुकल्या दक्षचा मृत्यू झाला.
हेही वाचा – विरार रेल्वेस्थानकात फलाट क्रमांक सहावर शॉटसर्किटमुळे आग
याप्रकरणी भांईदर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाण्यात जाणारी दुचाकी घसरल्याने हा अपघात झाला. शहा दांपत्य आणि त्यांची मुलगी जखमी झाले तर मुलाचा मृत्यू झाला अशी माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुर्यकात नाईकवाडे यांनी दिली.