लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी
वसई: क्रिडापटू हार्दिक पाटील यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला प्रकरणातील एक आरोपी शैलेंद्र खोपडे याला विरार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. शैलेंद्र हा कुख्यात गँगस्टर व गोल्डन गँगचा म्होरक्या चंद्रकांत खोपडे याचा मुलगा आहे.
विरारमध्ये राहणाऱ्या क्रिडापटू हार्दिक पाटील यांनी विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकून आर्यनमॅन हा किताब जिकंला आहे. ते विरारच्या वर्तक वार्डच्या स्वागत बंगल्यात राहतात. मागील वर्षी ४ मेच्या रात्री पावणे बाराच्या दरम्यान पाटील यांच्या घरावर अज्ञात आरोपींनी पेट्रोल बॉम्ब फेकून पाटील यांना मारण्याची योजना आखली होती. याप्रकरणी विरार पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, कट कारस्थान रचणे या कलमांन्वये गुन्हा दाखल केला होता.
आणखी वाचा-विरारमध्ये अज्ञात व्यक्तीने ३ मोटारसायकली जाळल्या
आतापर्यंत ८ आरोपींना अटक केली होती. वैयक्तिक वादातून सनी ठाकूर याने हा हल्ला घडवून आणला होता. या प्रकरणातील एका आरोपी शैलेंद्र खोपडे यांनी हार्दीक पाटील यांना व्हॉटसअपवरून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. विरार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला शैलेंद्र भोईवाडा येथे आल्याची माहिती मिळतात त्याला सापळा लावून अटक केली. शैलेंद्र याच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. याप्रकरणाती मुख्य आरोपी सनी ठाकूर फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती विरार पोलिसांनी दिली.