वसई: नालासोपारा येथे आयसीआयसीआय बँकेचे एटीएम लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी घटनास्थळावरून रंगेहात पकडले. मात्र अन्य दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले.
नालासोपारा पूर्वेच्या विजयनगर येथे आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आहे. मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास या एटीएम केंद्रामध्ये काही व्यक्ती संशयास्पद रित्या शिरल्याची माहिती काही स्थानिकांनी पोलिसांना कळवली. ही माहिती मिळताच तुळींज पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहून दोन आरोपी पळून गेले मात्र एकाला पोलिसांनी शिताफीने पकडले.
हृतिक राठोड असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे सुरा आणि कात्री असे साहित्य आढळून आले आहे. आरोपी एटीएम यंत्राची तोडफोड करून त्यातील रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलीस वेळीच घटनास्थळी पोचल्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला. आरोपी ऋतिक राठोड हा नालासोपारा येथे राहणार आहे त्याच्यावर यापूर्वी मुंबईमध्ये एटीएम चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत अशी माहिती तुळींग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिली.