वसई- अग्रवाल नगरी येथील ४१ इमारतींवरील कारवाईला वेग आला आहे. सोमवारी वसई विरार महापालिकेने अतिरिक्त यंत्रसामुग्रीचा वापर करून एकाच दिवसात ४ इमारत जमीनदोस्त केल्या. या कारवाईत आतापर्यंत १४ इमारती पाडण्यात आल्या आहेत.
नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथील आरक्षित जागेवर उभ्या असलेल्या ४१ इमारती महापालिकेतर्फे निष्काषित करण्यात येत आहे. मात्र आतापर्यंत ही कारवाई संथ सुरू होती. नोव्हेंबर महिन्यात ७ धोकादायक इमारती पाडण्यात आल्या होत्या. जानेवारी महिन्यात केलेल्या कारवाईत केवळ ४ इमारती तोडण्यात आल्या होत्या. रहिवाशांचा विरोध, त्यांना घरातून बाहेर काढण्यासाठी लागणारा वेळ यामुळे कारवाईला विलंब होत होता त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत केवळ १२ इमारती पाडण्यात आल्या होत्या. ही कारवाई संथ गतीने सुरू असल्याने पालिकेवर टिका होऊ लागली होती. अखेर पालिकेने सोमवार पासून जोरात कारवाई सुरू केली.सोमवारी पालिकेने नियोजन करून इमारती पाडण्यास सुरवात केली. एकाचे वेळी दोन पोकलेन आणि जेसीबीच्या सहाय्याने इमारती पाडण्यात आल्या. त्यामुळे सोमवार संध्याकाळ पर्यंत ४ इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या. आतापर्यंतच्या एकूण कारवाईत १६ इमारती पाडण्यात आल्या आहेत.
इमारतींच्या बांधकामानुसार पाडकामाचा वेळ ठरत असतो. सोमवारी आम्ही जास्त यंत्रसामुग्री आणली आणि एकाच वेळी दोन इमारती पाडण्यास सुरवात केली. त्यामुळे दिवसभरात ४ इमारती पाडण्यात आल्या, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त (अतिक्रमण) दिपक सावंत यांनी दिली. रहिवाशांचा घरे खाली कऱण्यास असलेला विरोध आणि इमारत पाडल्यानंतर राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी लागणारा वेळ यामुळे कारवाई संथ झाली होती असेही ते म्हणाले.
रहिवाशी वार्यावर
या इमारतींमधील रहिवाशांनी काही काळ तंबू बांधून इमारत परिसरातच मुक्काम केला होता. मात्र उघड्यावर संसार करणे शक्य नसल्याने त्यांनी मिळेल तिथे आपला आसरा शोधला आहे. काहींनी अन्य ठिकाणी भाड्याने तर काहींनी परिचितांकडे आश्रय घेतला आहे. सोमवारी देखील ४ इमारतींमधील बेघर झालेल्या रहिवाशांचा आक्रोश बघायला मिळाला.