वसई : नायगाव पूर्वेला रेल्वेस्थानकाजवळ फेरीवाल्यांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे प्रवाशांना येजा करण्यास अडथळे निर्माण झाले होते. अखेर पालिकेने या परिसरातील फेरीवाल्यांच्या टपऱ्यांवर कारवाई केली आहे. नायगाव पूर्वेतील स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठय़ा संख्येने फेरीवाले व भाजीविक्रेते व्यवसाय करतात. दिवसेंदिवस या फेरीवाल्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली होती. त्यामुळे या भागातून येजा करताना प्रवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. या भागातून वाट काढताना प्रवाशांना अक्षरश: कसरत करावी लागत होती.
विशेषत: सायंकाळच्या सुमारास या भागात अधिक संख्येने फेरीवाले मुख्य रस्त्याच्या मध्येच बसत असल्याने आणखी समस्या बिकट बनली होती. वाढत्या गर्दीत चेंगराचेंगरी सारखा प्रकारही घडण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत होती. या फेरीवाल्यांवर कारवाई करून वाट मोकळी करावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत होती. अखेर पालिकेने या ठिकाणी असलेल्या टपऱ्या जमीनदोस्त केल्या आहेत. या भागात कारवाई केल्याने येजा करण्याचा मार्ग मोकळा झाला असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.