भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील शौचालये अस्वच्छ करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे. यापुढे दर पंधरा दिवसांनी लोकप्रतिनिधींसह शहरातील प्रत्येक शौचालयाची पाहणी केली जाणार असल्याचे पालिका आयुक्तांनी सोमवारी जाहीर केले.
मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून शहरात २०१ ठिकाणी सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली आहेत. त्यांच्या देखभाल, दुरुस्ती आणि स्वच्छतेसाठी महापालिकेने ‘मे शाइन इंडिया’ या ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. त्यासाठी दरवर्षी ६ कोटी असे तीन वर्षांकारिता १८ कोटी रुपये देण्याचा करार केला आहे. ठेकेदाराने शौचालयात नियमित स्वच्छता राखणे, वास्तूची देखभाल करणे, नागरिकांना मोफत सुविधा देणे आणि कामाचे दैनंदिन रजिस्टर ठेवणे आदी अटी त्यामध्ये आहेत. मात्र ठेकेदार अशा कोणत्याच नियमाचे पालन करत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील शौचालयांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. अस्वच्छता, घाण, शौचालयात पाणी नसणे, या तक्रारी तर रोजच्याच आहेत. अनेक शौचालयांचे दरवाजेही चोरीला गेले होते. पालिकेने ठेकेदाराला १८ कोटी रुपये अदा केले होते. त्यामुळे अशा प्रकारे शौचालयांची दुरवस्था झाल्यास तसेच तेथील देखभाल न केल्यास पालिकेने ठेकेदाराचा ठेका रद्द करावा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सोमवारच्या महासभेत केली होती.
काँग्रेस नगरसेवक अनिल सावंत यांनी शौचालयाचा मुद्दा उपस्थितीत केला. या वेळी त्यांनी ठेकेदार प्रशासनाने बंधनकारक केलेल्या नियमांचा भंग करत आहे. त्याच्यावर १५ लाखांचा दंड आकारला असला तरीही सुधारणा होत नाही, असा आरोप केला. शिवसेना नगरसेवक प्रवीण पाटील यांनी स्वच्छता निरीक्षकच कामात हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप केला. शिवाय ठेकेदारावर थेट कारवाई करून त्याचा ठेकाच रद्द करावा, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली.
यावर बोलताना पालिका आयुक्त दिलीप ढोले म्हणाले, शौचालये अस्वच्छ करणाऱ्या तसेच त्यांची दुरवस्था करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार आहे. शहरातील नागरिकच हे करत असल्याचे कळते. यापूर्वीही काही नागरिकांवर कायदेशीर गुन्हे दाखल केले आहेत. यापुढे आता दर १५ दिवसांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसह शौचालयाची पाहणी करणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

Story img Loader