राज्यात तंबाखूजन्य हुक्का पार्लरवर बंदी आहे. तरीही हर्बल हुक्का पार्लरच्या नावाखाली अवैधपणे हुक्का पार्लर व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत. गुरुवारी पहाटे मिरारोड येथे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने १९९३ दि कन्टेनर किचन याठिकाणी अवैध हुक्का पार्लरवर कारवाई केली आहे. याप्रकरणी हुक्का चालक व ग्राहक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मीरा भाईंदर शहरातील मीरारोड पूर्वेच्या भागात असलेल्या

१९९३ दि कन्टेनर किचन या हॉटेल मध्ये महाराष्ट्र राज्य प्रतिबंधित असलेले तंबाखू जन्य पदार्थ वापरून हुक्का उपलब्ध करून तो ग्राहकांना पुरविला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या पथकाला माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तुपलोंढे व त्यांच्या पथकाने गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली आहे.

सदर ठिकाणी शासन बंदी असलेला हुक्का सर्रास वापरला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यावेळी पोलिसांनी हॉटेल मधील मो. साहेब सलीन खान (२७) अरहान शाहबुद्दीन खान (२३), आरीफ नसरुद्दीन आलम (२१), तोहीद तस्लीम अन्सारी (२०), रहिम अली हुसेन (२२) मनीष सुखबिर रॉय( ३०) या सहा हॉटेल चालक व कर्मचारी यांच्यासह हुक्का ओढणारे ११ ग्राहकांवर कारवाई केली आहे. यात १९ हजार रुपये किंमतीचा तंबाखुमिश्रीत हुक्का जप्त करण्यात जप्त केला आहे.

याप्रकरणी काशिमिरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम २८७, ३(५) सह सिगारेट व इतर तंबाखु उत्पादने यांचा व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि त्यांचे उत्पादन, पुरवठा व वितरण यावर निबंध अधिनियम २००३ चे कलम ४ (क), २१ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सदरची कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष मिरा-भाईंदर पथकाचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तुपलोंढे, उमेश पाटील, रामचंद्र पाटील, राजाराम आसावले, शिवाजी पाटील, चेतनसिंग राजपुत, केशव शिंदे, अश्विनी भिलारे यांनी केली आहे.

बंदी असतानाही हुक्का पार्लर सुरू ?

राज्यात तंबाखूजन्य हुक्का पार्लरवर बंदी आहे. तरीही हर्बल हुक्का पार्लरच्या नावाखाली अवैधपणे हुक्का पार्लर व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत. यावर प्रभावी पणे नियंत्रण आणण्यासाठी नुकताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंदीची घोषणा केली होती. कायद्यात सुधारणा करून अवैधरित्या हुक्का पार्लर चालविण्याचा गुन्हा केल्यास तीन वर्ष कैदेची शिक्षा होते, आता दुसऱ्यांदा हा गुन्हा केल्यास कैदेसह उपहारगृहाचा परवाना रद्द करण्यात येईल. तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास परवाना कायमस्वरूपी रद्द करून हा गुन्हा अजामीनपात्र करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतर ही वसई विरार व मीरा भाईंदर शहरात बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालविले जात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.