वसई : नालासोपारा पश्चिमेच्या रेल्वेच्या जागेत अतिक्रमण करून झोपडय़ा व घरे उभारण्यात आली होती. या अतिक्रमणावर मंगळवारी रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मोठय़ा प्रमाणात झोपडय़ा जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत.
नालासोपारा येथील पश्चिमेच्या निळे भागात रेल्वेच्या जागेत नागरिकांनी अतिक्रमण करून राहण्यासाठी झोपडय़ा उभारल्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात नागरिक राहत होते. मात्र आता रेल्वेकडून रेल्वेची जागा मोकळी करण्याचे काम सुरू केले असून रेल्वेच्या जागेत असलेले अतिक्रमण हटविण्यात येत आहे.
नालासोपारा पश्चिमेकडील रेल्वेच्या जागेवर असलेल्या अतिक्रमित झोपडय़ांवर रेल्वे प्रशासनाने मोठय़ा पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्यान तोडक कारवाई केली आहे. या कारवाईत शंभराहून अधिक कुटुंबे बेघर झाली आहेत. कारवाईच्या मोहिमेत नागरिकांची वस्ती उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांकडून रेल्वेच्या कारवाईला विरोध केला जात आहे. प्रशासनाने इथल्या नागरिकांना राहण्यासाठी पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
सध्या ज्या नागरिकांची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत त्यांच्यावरील कारवाई थांबविण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी कारवाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना केली होती. ती मागणी मान्य करून काही झोपडय़ा तोडण्याचे काम थांबविले असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. रेल्वे प्रशासनाने सध्या थोडा वेळ द्यावा अशी मागणीही येथील नागरिक करीत आहेत.
नागरिकांच्या पुनर्वसनाचे काय?
रेल्वेला सर्वोच्च न्यायालयाने रेल्वेच्या ज्या काही अतिक्रमित जागा आहेत त्या मोकळय़ा करण्याचे आदेश दिले होते. त्यात ज्या ठिकाणी अतिक्रमण करून नागरिक राहत आहेत त्या नागरिकांच्या पुनवर्सन व त्यांच्या राहण्यासाठीच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्यासुद्धा करण्यात याव्या असेही आदेशात नमूद केले होते. मात्र रेल्वेने त्या नागरिकांची कोणतीही सुविधा उपलब्ध न करून देताच सरसकट कारवाईला सुरुवात केली असल्याचे माजी नगरसेवक किशोर पाटील यांनी सांगितले आहे. या भागात अनेक वर्षांपासून नागरिक राहत आहेत. शासनाने त्यांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी पाटील यांनी शासनाकडे केली आहे.
नालासोपाऱ्यात रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमणांवर कारवाई; मोठय़ा प्रमाणात झोपडय़ा जमीनदोस्त
नालासोपारा पश्चिमेच्या रेल्वेच्या जागेत अतिक्रमण करून झोपडय़ा व घरे उभारण्यात आली होती. या अतिक्रमणावर मंगळवारी रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 06-04-2022 at 01:40 IST
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action encroachments railway site nalasopara large number slum landlords amy