लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी
वसई: नालासोपार्यात एका रहिवाशी इमारतीत सुरू असलेल्या एका जुगाराच्या अड्डयावर तुळींज पोलिसांनी छापा मारून कारवाई केली आहे. यावेळी पैसे लावून जुगार खेळणार्या ८ जणांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.
नालासोपारा पूर्वेच्या सेंट्रल पार्क येथील रचना इमारतीत जुगार सुरू असल्याची माहिती तुळींज पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी संध्याळी तुळींज पोलिसांच्या पथकाने या इमारती मधील २०२ क्रमांकाच्या फ्लॅवर छापा मारला. यावेळी ८ जण पैसे लावून तीन पत्ती जुगार खेळत असल्याचे आढळले. मनोज परमार हा या जुगार प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याची माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्रात्रय पाटील यांनी दिली.
आणखी वाचा-विरारमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे ५५ अनधिकृत इमारती; शिक्के, लेटरपॅड जप्त, ५ जणांना अटक
या कारवाईत पोलिसांनी जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी मनोज परमार याच्यासह राजू अहिर, धर्मेंद्र भायानी, मुकेश भायानी, मनिष भुतिया, हसमुख धाकड, नवीन गाला आणि दिनेश जसवानी या ८ जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४(अ) आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या फ्लॅट मघ्ये जुगार सुरू होता तो एका महिलेचा आहे. कारवाई झाली तेव्हा महिला घरात नव्हती. तिचा जबाब नोंदवून तिच्यावर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली.
श्रावण महिन्यात जुगार खेळण्याची प्रथा आहे. त्यामुळे हा जुगार ठिकठिकाणी खेळला जात आहे. आम्हाला जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच तात्काळ आम्ही पथक पाठवून कारवाई केली अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिली.