वसई: वसईत मुदत संपलेल्या ११ ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. येत्या १६ ऑक्टोबरला या ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदासाठी ४७ केंद्रावर मतदान होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. वसईतील खानिवडे, शिरवली, मेढे, पोमण, शिवणसई, आडणे, उसगाव, माजीवली- देपीवली, चंद्रपाडा, सकवार, भाताने या ग्रामपंचायतीसाठी रविवारी निवडणूक पार पडणार आहे. यात ११ सरपंच व ११९ सदस्य अशा जागा आहेत. यातील ८ सदस्य हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता सरपंच व सदस्य मिळून १२२ जगासाठी मतदान होणार आहे. यासाठी २९२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वसईतील ४७ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी ४७ मतदान यंत्र (ईव्हीएम मशीन) सील बंद करून ठेवण्यात आल्या आहेत व २० मतदान यंत्रे ही राखीव ठेवली आहेत, तसेच या निवडणूक कामासाठी २७५ अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मतपेटय़ा व कर्मचारी यांची वाहतूक करण्यासाठी ७ चारचाकी वाहने व १५ बसेस अशी २२ वाहनांची व्यवस्था करण्यात आली असल्याची वसई तहसील विभागाने दिली आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १७ ऑक्टोबरला होणाऱ्या मतमोजणीचेही नियोजन करण्यात आले आहे. प्रभागनिहाय मतमोजणी केली जाणार आहे. सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा