तौक्ते चक्रीवादळानंतर अनेक घरांचे पत्रे व कौलांची पडझड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : तौक्ते चक्रीवादळामुळे ग्रामीण सह विविध ठिकाणच्या भागात घरांची पडझड झाली आहे. मात्र आता वादळ शांत झाले असून नागरिकांनी आवराआवर करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी पावसाळ्यापूर्वीच घरांची डागडुजी, छतावरील स्वच्छता कौले बदलणे आदी दुरुस्तीच्या कामाची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसून आले आहे.

वसईच्या ग्रामीण भागात अनेक भागांत कौलारू, पत्र्याचे छत असलेली जुन्या पद्धतीची घरे आहेत. पावसाळ्यात पाणी, वादळी वारा यापासून आपले संरक्षण व्हावे यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी घरांची झालेली पडझड, सरकलेली कौले, पाणी गळती होण्याची ठिकाणे यासह  इतर  दुरुस्तीची कामे घेतली जातात परंतु यंदाच्या वर्षी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्याआधीच तौक्ते वादळाने अनेक घरांचे नुकसान केले आहे. त्यातही आता स्वत:ला सावरत अनेकांनी आपल्या घरांची दुरुस्ती करण्याची कामे हाती घेतली आहेत.

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याआधीच ही कामे पूर्ण झाली पाहिजे यासाठी घरमालकांनी कंबर कसली आहे. करोनाचे संकट असल्याने दुरुस्तीसाठी लागणारे सर्वच साहित्य पटकन उपलब्ध होते असे नाही. त्यामुळे खिळे,चुका, सिमेंट, प्लास्टिक ताडपत्री, दोऱ्या, कौले, यासह इतर साहित्याची जुळवाजुळव करून कामे सुरू असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. वादळी वाऱ्याने नुकसान केले नसते तर एवढय़ात कामे आटोपली असती परंतु यावेळी अचानक झालेल्या वादळात पडझड जास्त प्रमाणात झाली आहे.  त्यामुळे काही कामे ही पुन्हा नव्याने करावी लागत आहेत. एकंदरीत येणारे पावसाचे पाणी घरात घरात घुसू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

मजुरांची टंचाई

सध्या सर्वत्र करोनाचे संकट आहे. त्यामुळे घरांच्या दुरुस्तीच्या कामासाठी आवश्यक असलेले दुरुस्तीचे कारागीर  करोनाच्या भीतीने पुढे येत नाही. त्यामुळे काम करण्यास मजुरांची कमतरता भासू लागली आहे. यामुळे एकमेकांना सहकार्य करून डागडुजीची कामे हाती  घेण्यात आली असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.