वसई: गुरुवारी रात्रीपासून वसई, विरार शहरात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे महामार्गासह शहरातील विविध ठिकाणचे रस्ते जलमय झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मागील काही दिवसांपासून शहरात अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू होता. मात्र गुरुवारी रात्रीपासून सुरुवात केलेल्या पावसाने शुक्रवारीही दमदार हजेरी लावली.
विरारमधील मनवेल पाडा रोड, जीवदानी पाडा, चंदनसार रोड, नालासोपारा येथील तुळिंज, आचोळे हनुमान नगर, टाकी रोड, प्रगती नगर, राम नगर, धानीव बाग, पेल्हार वसई पश्चिमेतील होळी रस्ता, देवतलाव, सागरशेत – मुळगाव रस्ता, अर्नाळा रस्त्यावर बोडन नाका, पसायदान सेंटर ते भाऊसाहेब वर्तक शाळा विरार येथील विवा महाविद्यालयाजवळील रस्ता माणिकपूर, नायगाव पूर्व पश्चिम अशा विविध ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले होते. काही ठिकाणी अधिक प्रमाणात पाणी साचून राहिल्याने या ठिकाणाहून ये जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला.
या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली आहे. तर काही ठिकाणी वाहतूक व्यवस्थाही कोलमडून गेल्याने कामावर ये जा करण्यासाठी रिक्षा वेळेत नसल्याने भर पावसात उभे राहून रिक्षांची वाट बघत उभे राहावे लागले. तसेच पावसामुळे विविध ठिकाणच्या भागात पडलेल्या खड्डय़ात पाणी साचून राहिल्याने खड्डय़ातून प्रवास करताना अडचणी निर्माण झाल्याने वाहतुकीवर याचा परिणाम झाला होता. तर नालासोपारा तुळिंज रोड, विरार येथील स्वामी नगर परिसर या दोन ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन पडलेली झाडे हटविण्यात आली. तर काही ठिकाणी गृहसंकुलातही पाणी घुसल्याने पुन्हा एकदा नागरिकांना सामानाची उचलठेव करावी लागली.
शुक्रवारी सकाळ सहापर्यंत सरासरी ६७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. मात्र सकाळी सातनंतर पावसाने जोर धरला होता. सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सरासरी ६३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत वसईत २ हजार ८३२ मिमी इतका पाऊस झाला असल्याची माहिती तहसिलदार विभागातून देण्यात आली आहे.
वसईतील पाऊस (मिमी)
विभाग सरासरी पाऊस
मांडवी- ३७
आगाशी – ६८
निर्मळ – ७९
विरार – ५२
माणिकपूर – ४१
वसई- १०४
सरासरी एकूण पाऊस – ६३
खड्डय़ांचे तळे
पालिकेने खड्डे दुरुस्तीच्या नावाखाली चालवलेल्या प्रयोगाने रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य तयार झाले आहे. आधीच या खड्डय़ातून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत होता. त्यातच आता पावसामुळे पुन्हा हे खड्डे पाण्याने भरून गेले. पावसाची रिपरिप आणि ढगाळ वातावरणाने काळोख असल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरील खड्डय़ाचा अंदाज येत नाही. यामुळे अनेक वाहने खड्डय़ात आदळून बंद तर काही वाहने घसरून पडत आहेत. काही नागरिक किरकोळ जखमी होत आहेत. तर दुचाकीवर मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मीरा-भाईंदर परिसर पाण्याखाली
भाईंदरमधील बी पी रोड, बेकरी गल्ली तर मीरा रोड येथील कृष्ण स्थळ आणि हाटकेश येथील परिसर पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पालिकेच्या उपायुक्तांनी पाहणी केली. तसेच पुढील चार दिवस पावसाचा असाच जोर सुरू राहणार असल्यामुळे आवश्यक ठिकाणी पाणी उपसणारे पंप बसवावे, असे आदेश आयुक्त दिलीप ढोले यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
भातशेती संकटात
वसई: वसईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भातशेती संकटात सापडली आहे. भाताची कणसे तयार होण्यास सुरुवात झाली असून ती कणसे गळून पडण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. वसईत यंदाच्या वर्षी सात हजाराहून हेक्टर क्षेत्रात भात पिकांची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने भातशेतीला चांगला बहर आला असून आता भाताची उगवण म्हणजेच निसवण सुरू झाली आहे. परंतु मागील काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. शुक्रवारी शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणच्या भातशेतीमध्ये पाणी साचून आहे. निसवण सुरू झालेल्या कणसांनी फुलोरा धरायला सुरुवात केली आहे . मात्र हा फुलोरा गळून जाण्याची भीती आहे . जर फुलोरा गळला तर पुढे निसवणारी कणसे दाणा न भरलेले भात उगविण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.