वसई: गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवून उच्चभ्रू तरुणींना आपल्या जाळ्यात ओढवून त्यांची आर्थिक फसवणूक करून लैंगिक अत्याचार करणार्‍या ठकसेनाला वालीव पोलिसांनी अटक केली आहे. हिमांशू पांचाळ असे या ठकसेनाचे नाव आहे. आतापर्यंत त्याने १२ हून अधिक तरुणींना फसवून त्यांच्यावर बलात्कार केल्याचे तसेच त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लग्न जुळविण्यासाठी मुली शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर आपले नाव नोंदवतात. त्याचाच फायदा अहमदाबाद येथे राहणारा ठकसेन हिमांशू पांचाळ याने उठवला. त्याने आपले बनावट प्रोफाईल या संकेतस्थळावर बनवले. गुन्हे शाखेचा सायबर विभागातील अधिकारी असल्याचे भासवले. खानदानी श्रीमंत असून गल्लेलठ्ठ पगार, भरपूर मालमत्ता असल्याचे त्याने त्यात लिहिले होते. तो अनेक तरुणींना संपर्क करायचा. मग त्यांना भेटायला वसई, मुंबई परिसरातील लॉज मध्ये बोलवायचा. तेथे मुलींवर प्रभाव पाडायचा आणि त्यांना लग्न करण्याचे आमिष दाखवायचा. मुलींना तो नकरी हिऱ्याचे दागिने भेट द्यायचा. पहिल्या भेटीतच तो तरुणींना शरीरसंबंध ठेवण्यााठी भाग पाडत होता. नंतर वेगवेगळी कारणे देत मुलींकडून पैसे उकळत होता. तरुणींशी संबंध बनवल्यानंतर तो फरार व्हायचा.

असा प्रकार उघडकीस आला

मिरा रोड येथील ३१ वर्षांच्या तरुणीने याबाबत ६ फेब्रुवारी रोजी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर तिची ओळख हिमांशू पांचाळ (२६) याच्याशी झाली होती. त्याने तिला वसईच्या रुद्र शेल्टर या हॉटेल मध्ये बोलावले आणि तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले. यानंतर तिच्याशी बळजबरीने शरिरसंबंध देखील प्रस्थापित केले. २१ ते २३ जानेवारी रोजी त्याने तिला अहमदाबाद येथे बोलावून हॉटेल पॅरागॉन व्हिला येथेही तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. या काळात आरोपी हिमांशू आणि पीडित तरुणी कडून आयफोन १६, 78 हजार रुपये रोख तसेच सोन्याचे दागिने गोड बोलून काढून घेतले. लग्न होणार असल्याने पीडित तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला होता. परंतु नंतर तो फोन बंद करून पसार झाला. तिची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलीस ठाणे गाठले.

तांत्रिक तपास करून केली अटक

याबाबत माहिती देताना वालीव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी सांगितले की, आरोपी हिमांशू पांचाळ हा बोलण्यात पटाईत होता. तो उत्तम इंग्रजी बोलून मुलींवर प्रभाव टाकायचा. एकाच वेळी ५ फोन, ॲपलचा लॅपटॉप वापरायचा. तो फक्त हॉटेलच्या वायफाय वरूनच मुलींशी व्हॉटसअप कॉलवरून बोलत होता. आम्ही तांत्रिक विश्लेषण करून त्याला अहमदाबाद येथून अटक केली. त्याने मागील दिड वर्षात १२ हून अधिक मुलींची अशाप्रकारे फसवणूक केल्याची माहिती सानप यांनी दिली.

हिमांशू याच्यावर २०२१ मध्ये माहिती तंत्रज्ञान अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल आहे. अनेक तरुणींची त्याने फसवणूक केली असली तरी बदनामी पोटी कोणी तक्रारी केल्या नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील, वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे, पोलीस निरीक्षक गोरखनाद जैद, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, विश्वासराव बाबर तसेच किरण म्हात्रे, सचिन दोरकर, पांडुरंग कुडू, बाळू कुटे, आदींच्या पथकाने ही कारवाई करून त्याला अटक केली.