बनावट कागदपत्रांद्वारे आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप

वसई : व्यसनमुक्ती आणि एचआयव्ही संसर्ग याबाबत काम करणाऱ्या वसईतील प्रसिद्ध कृपा फाऊंडेशन या संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त फादर केझेटीन मिनेझिस यांच्यासह तीन सदस्यांवर वसई पोलीस ठाण्यात फसवणूक आणि खोटी कागदपत्रे बनवून निधीचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, विश्वस्तांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. आम्ही कुठलीही बनावट कागदपत्रे बनवलेली नाहीत, सर्व व्यवहार विश्वस्तांच्या बैठकीत झालेल्या ठरावांनुसार केले आहेत, असा दावा विश्वस्तांनी केला आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे समाजसेवक धर्मगुरू पद्माश्री फादर जोसेफ ऊर्फ ज्यो परेरा यांनी १९८६ मध्ये वसईत कृपा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना केली होती. व्यसनमुक्ती आणि एचआयव्हीबाधितांवर उपचार करण्याचे कार्य संस्थेतर्फे करण्यात येते. या संस्थेचे काम १३ राज्यांत सुरू आहे. वसईच्या पापडी येथे संस्थेचे सर्वांत मोठे व्यसनमुक्ती पुनर्वसन आणि एचआयव्ही उपचार केंद्र आहे. २०१९ मध्ये संस्थेला केंद्र शासनाकडून ‘आऊटरीच अ‍ॅण्ड डंपिंग सेंटर’ (ओआयडीसी) तसेच ‘कम्युनिटी बेस्ड पिअरलेड इंटरव्हेन्शन’ (सीपीएलआय) या दोन प्रकल्पांना मंजुरी मिळाली होती. या प्रकल्पांसाठी येणारा निधी संस्थेच्या अधिकृत बँक खात्यात जमा न होता तो अन्यत्र वळवला जात असल्याचा आरोप फादर ज्यो यांनी केला आहे. संस्थेचे विद्यमान व्यवस्थापकीय विश्वस्त (मॅनेजिंग ट्रस्टी) फादर केझेटीन मिनेझिसस ब्रुनो कोयलो आणि लिनस पिंटो यांनी खोटी कागदपत्रे तयार करून पापडी येथील अ‍ॅक्सिस बँकेत दोन खाती उघडली आणि त्यात हा निधी वळविल्याचा आरोप फादर ज्यो यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे.

वसईच्या न्यायालयातून फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६ अन्वये आम्हाला गुन्हा दाखल करण्याचे आदेश आले होते. बनवाट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी व्यवस्थापकीय विश्वस्तांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण कर्पे यांनी सांगितले.

व्यवहार कायदेशीरच; विश्वस्तांचा दावा

फादर केझेटिन मिनेझिस यांनी हे आरोप फेटाळले आहेत. बँक खाती उघडण्याचा निर्णय संस्थेच्या विश्वस्तांच्या बैठकीत झाला होता. ‘आयसीआयसीआय’ बँकेत सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून खाती उघडण्यात आली. या खात्यात दोन्ही योजनांमधून अनुक्रमे सात आणि पाच लाख अशी रक्कम आली. ती वेतनासाठी वापरण्यात आली. सर्व व्यवहार धनादेशाद्वारे झाले आहेत. कुठेही गैरव्यवहार झालेला नाही, असे त्यांनी सांगितले. एकतर्फी माहितीच्या आधारे खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा त्यांनी केला.

फादर ज्यो यांची तक्रार… बँकेत खाते उघडण्यासाठी फादर केझेटीन मिनेझिसस ब्रुनो कोयलो आणि लिनस पिंटो यांनी २३ ऑगस्ट २०१९ रोजी झालेल्या ठरावाची बनावट प्रत माझ्या खोट्या सहीच्या आधारे बँकेत सादर केली, तसेच धर्मादाय आयुक्तांनादेखील खोटा अहवाल सादर केला आहे. हा ठराव केला तेव्हा मी परदेशात होतो, असेही फादर ज्यो यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून तिघांविरोधात वसई पोलीस ठाण्यात फसवणूक आणि बनावट कागदपत्रे बनविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.