वसई : विरार वरून चर्चगेटला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये आढळेल्या एका बेवारस बॅगेमुळे बॉम्बची अफवा पसरली होती. तपासणी नंतर ही अफवा असल्याचे सिद्ध झाले. ही बॅग प्रवाशाची होती. मात्र या प्रकारामुळे एकच भिती पसरली होती.रविवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील महिलांच्या डब्यात एक बेवारस बॅग आढळली. बॅगेत बॉम्ब असल्याच्या अफवेमुळे एकच गोंधळ उडाला. त्यामुळे गाडी वसई रोड रेल्वे स्थानकात थांबविण्यात आली.
बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करून बॅगेची तपासणी करण्यात आली. यावेळी परिसर रिकामा करण्यात आला आणि मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र बॅगेत काहीही संशयास्पद आढळले नाही. ही बॅग ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या प्रवाश्याची असून त्यात त्याचे सामान होते, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले. साडेसातच्या सुमारास ट्रेन रवाना करण्यात आली.