वसई – खदाणीत साचलेल्या पाण्यात पडलेला चेंडू काढायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना विरार येथे घडली आहे. यश सोनकर (१७) असे या मुलाचे नाव असून तो विरार पूर्वेच्या साईनाथ डोंगरी येथे राहतो.
वसई विरार शहरात अनेक दगडखाणी आहेत. सध्या पावसाळा असल्याने या दगडखाणींच्या जागेत पाणी साचून तलाव तयार झाला आहे. गुरुवारी दुपारी विरार पूर्वेच्या साईनाथ डोंगरी येथे असलेल्या दगडखाणीच्या परिसरात मुले क्रिकेट खेळत होती. त्यांचा चेंडू या पाण्यात पडला. तो काढायाला यश सोनकर हा १७ वर्षांचा मुलगा पाण्यात उतरला. मात्र तोल जाऊन तो पाण्यात बुडाला.
हेही वाचा – वसई विरार शहराला आगीचा धोका, केवळ २.९३ टक्के आस्थापनांचे अग्निसुरक्षा लेखा परीक्षण
हेही वाचा – शहरबात : ..ही सुवर्णसंधी वाया घालवू नका
पालिकेच्या अग्निशमन पथकाकडून शोध मोहीम सुरू होती. मात्र त्याचा शोध लागला नाही. शुक्रवारी पुन्हा ही मोहीम सुरू करण्यात आली आणि यशचा मृतदेह सापडला. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील तलावे, समुद्रकिनारे धोकादायक असून तेथे न जाण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.