वसई: ‘त्रांगडे’, ‘विद्यापीठ’ ‘कॅन्सर’ अशा एकापेक्षा एक गाजलेल्या साहित्य कृतींची निर्मिती करणारे प्रतिभावान लेखक अनंत कदम यांचे गुरुवारी रात्री वसईत निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. मागील पाच वर्षांपासून ते पक्षघातच् आणि ब्रेन ट्युमरमुळे आजारी होते. त्यातच त्यांना स्मृतिभ्रंशाचा आजार जडला होता.
त्यांच्यावर वसईतील कार्डिनल ग्रेशस रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात ज्यू धर्मीय पत्नी, तीन विवाहित मुले आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.
मराठीसह इंग्रजी आणि संस्कृत भाषेत बहुरंगी लिखाण करणारे तसेच पाली भाषेतुन मराठीत पुस्तके अनुवादित करणारे लेखक म्हणून अनंत कदम प्रसिद्ध होते. सत्तर आणि ऐंशी च्या दशकात त्यांनी तिन्ही भाषेत लिखाण केले. त्यांची ऐंशीहुन अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. लेखक, कादंबरीकार आणि नाटककार म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांचे एक पुस्तक तर लंडनच्या प्रकाशकाने प्रसिद्ध केले होते. कदम यांच्या साहित्यावर एका विद्यार्थ्यांने डॉक्टरेट देखील मिळवली होती. लोकसत्ताचे ते बरीच वर्षे स्तंभलेखक होते.