विरार : विरारच्या आयसीआयसीआय बॅंकेच्या शाखेत दरोडा घालून महिला व्यवस्थापकाची हत्या कऱणारा आरोपी अनिल दुबे शुक्रवारी पोलिसांच्या तावडीतून फरार झाला आहे. शुक्रवारी त्याला वसईच्या सत्र न्यायालयात आणले जात असताना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो फरार झाला आहे.
२९ जुलै २०२१ मध्ये विरारच्या पुर्वेला असलेल्या आयसीआयसीआय बॅंकेत दरोड्याची रक्तरंजित घटना घडली होती. याच बॅंकेचा माजी व्यवस्थापक असलेल्या अनिलकुमार राजीव दुबे याने हा दरोडा टाकला होता. यावेळी त्याने महिला व्यवस्थापकिसा योगिता चौधरी यांची हत्या केली होती तर श्वेता देवरूखकर या महिला कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला होता. लुटीची रक्कम घेऊन पळत असताता त्याला स्थानिक नागरिकांनी अटक केली होती. कर्जबाजारी झाल्याने त्याने बँक लुटण्याची योजना आखली होती. या गुन्ह्यात तो सध्या ठाणे तुरुंगात होता. शुक्रवारी ठाणे पोलिसांनी त्याला वसई सत्र न्यायालयात सुणावणीसाठी आणले असता न्यायालयाच्या परीसरात पोलिसांच्या हाताला झटका देऊन त्याने पळ काढला. वसई पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त परिमंडळ २ चे उपायुक्त सुहास बावचे यांनी दिली आहे.