विरार: मागील काही महिन्यांपासून तापमानाचा कडाका वाढला असल्याने त्याचा त्रास आता माणसांसोबत जनावरांनाही होत आहे. वसई-विरार परिसरातील जनावरांना उष्माघातासह विविध आजारांचा धोका वाढला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे मुक्या प्राण्यांचे हाल होत आहेत. पशु वैद्यकीय दवाखान्यात दिवसाला ९० ते १०० पशु उपचारार्थ दाखल केले जात आहेत. त्यात जनावरांमध्ये उन्हाळी तापाचा आणि उष्माघाताचा धोका वाढत आहे.
एप्रिल महिन्यापासूनच तापमानाचा पारा चढलेला दिसत आहे. सध्या वसई-विरारमध्ये सरासरी तापमान ३६ ते ४० अंश सेल्सिअस आहे. जनावरांना या कडक उन्हात प्रचंड त्रास होत आहे. वसई विरारमध्ये २०व्या पशु जनगणनेनुसार गायवर्गीय १ हजार ४५४, म्हशी २४ हजार ६७२, शेळय़ा ५२, बकऱ्या ३५९, तर ८३ डुकरांची नोंद करण्यात आली आहे. वसई तालुका पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. नकुल कोरडे यांच्या माहितीनुसार, वाढत्या उन्हामुळे पशूंना उष्माघाताचा त्रास होण्याचे प्रमाण वाढले आहे. वसई-विरारमधील ९ पशू वैद्यकीय दवाखान्यांमध्ये दिवसाला ९०-१०० पशूंना उपचारांसाठी आणले जात आहे.
उन्हाळय़ात ओला चारा आणि पाणी पुरेसे मिळत नाही. अन्नपाण्याच्या शोधात जनावरे अधिक भटकंती करतात आणि रणरणत्या उन्हातान्हात फिरल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. उष्माघातामध्ये जनावरांच्या शरीराचे तापमान १०० ते १०७ अंशापर्यंत वाढू शकते. यामुळे श्वसनाचा वेग वाढणे, हृदयाचे ठोके वाढणे, जीभ बाहेर काढून तोंडाने श्वसन करणे, लाळ गाळणे, नाकातून स्राव येणे, भरपूर तहान लागणे, अस्वस्थता येणे, तोल जाऊन जनावर कोसळणे, झटके येणे व जनावरे दगावण्याची भीती वाढली आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या जनावरांसाठी पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण करून घेण्याचे आवाहन कोरडे यांनी केले आहे. अतिप्रखर सूर्यप्रकाशामुळे जनावरांची प्रजननक्षमता कमी होणे, वजन घटणे असे अनेक त्रास जनावरांना होतात.
मोकाट जनावरांना धोका जास्त
चारा व पाणीटंचाईमुळे अनेक पशुपालक आपली जनावरे मोकाट सोडताना दिसतात. या जनावरांना वेळेवर चारापाणी केले जात नाही. चारा-पाण्याच्या शोधात वणवण केल्यामुळे ऊन लागून जनावरांना झटके येणे, तोल जाऊन ते जमिनीवर कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे.
उन्हाच्या कडाक्यामुळे पशुआरोग्य ढासळले ; प्राण्यांना उष्माघाताचा धोका, पशुपालकांनी काळजी घेण्याचे आवाहन
मागील काही महिन्यांपासून तापमानाचा कडाका वाढला असल्याने त्याचा त्रास आता माणसांसोबत जनावरांनाही होत आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 28-04-2022 at 01:44 IST
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animal health deteriorated heat wave animals risk heatstroke call care breeders amy