वसई : वसईतील महिला वकिलाला डिजिटल अरेस्ट करून ५० लाखांची फसवणूक केल्याचे प्रकरण ताजे असताना डिजिटल अरेस्टचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. विरार मध्ये राहणार्या ७३ वर्षीय वृध्द महिलेला सायबर भामट्यांनी डिजिटल अरेस्टची भीती घालून २० लाखांचा गंडा घातला आहे. डिजिटल अरेस्ट करून आर्थिक फसवणूक करण्याची ही मागील ८ महिन्यातील चौथी घटना आहे.
फिर्यादी महिला या ७३ वर्षांच्या असून विरार पश्चिमेला राहतात. त्या घरात खासगी शिकवणी घेतात. २७ मार्च रोजी त्यांना सायबर भामट्याने फोन केला. त्याने नाशिक पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांच्यावर मनी लॉंड्रींग, पोर्नोग्राफी असे विविध २० गुन्हे दाखल असल्याची थाप मारली. त्यानंतर व्हिडियो कॉल करून गणवेशधारी पोलीस समोर असल्याचे भासवले. याप्रकरणा त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात आल्याचे सांगितले.
फिर्यादी यांचा विश्वास बसावा यासाठी त्यांच्या मोबाईलवर बनावट एअआयआर, उच्च न्यायालयाच्या लेटरहेड खाली असलेला दस्तावेज, पोलिसाचे बनवाट ओळखपत्र आदी पाठवले. याप्रकरणातून बाहेर पडण्यासाठी मग पैशांची मागणी केली. तीन दिवसात सायबर भामट्यांनी फिर्यादी महिलेकडून तीन दिवसात २० लाख ३० हजार रुपये उकळले. फिर्यादी महिलेने विविध बॅंक खात्यात हे पैसे पाठवले.
मात्र सायबर भामट्यांकडून पैशांची मागणी वाढतच होती. त्यामुळे नंतर त्यांना सशंय आला. परंतु तो पर्यंत त्यांनी २० लाख रुपये गमावले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येतात त्यांनी बोळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकऱणी आम्ही फसवुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहोत अशी माहिती बोळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश सावंत यांनी दिली.
डिजिटल अरेस्ट नावाचा कुठलाही प्रकार नाही. नागरिकांनी अशा कुणाच्याही दाव्यांना बळी पडू नये. असा कुणाचा फोन आल्यास तात्काळ स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. लोकं घाबरतात आणि त्यामुळे सायबर भामटे फायदा उचललात, असेही पोलिसांनी सांगितले.
डिजिटल अरेस्ट फसवणुकीची ८ महिन्यातील ४ थी घटना
१) ४ सप्टेंबर २०२४
वसईत राहणार्या एका आयटी तज्ञाची बंगळूर येथील आयबी अधिकारी असल्याचे भासवून १ कोटी ४१ लाखांची फसवणूक
२) ६ सप्टेंबर २०२४
बँकेतून निवृत्त झालेला एका वृध्द महिलेला डिजिटल अरेस्टची भीती घालून सायबर भामट्यांकडून २८ लाखांचा गंडा.
३) ७ एप्रिल २०२५
महिला वकिलाची तोतया सीबीआय अधिकारी बनवून डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ५० लाखांची फसवणुक
४) ११ एप्रिल २०२५
वृध्द महिलेची नाशिकचे पोलीस अधिकारी असल्याचे भासवून २० लाखांची फसवणूक