वसई: शहरातील व्यावसायिक, उदद्योजक कंत्राटदार आदींना धमक्या देण्याचे प्रकार वाढले आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी तसेच खंडणीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी मिरा भाईंदर पोलीस आयुक्तालयात खंडणी विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना १ ऑक्टोबर २०२१ रोजी झाली. सध्या आयुक्तालयात १९ पोलीस ठाणी आहेत तर गुन्हे शाखेची विविध विभाग कार्यरत आहेत. त्यात तीन गुन्हे शाखा, मध्यवर्ती गुन्हे शाखा, अमली पदार्थ विरोधी शाखा, अनैतिक मानवी वाहतूक शाखा, सदोष मनुष्यवध शाखा, भरोसा कक्ष आदींचा समावेश आहे. पोलीस ठाणी तसेच गुन्हे शाखेच्या माध्यमातून विविध गुन्ह्यांचा तपास करण्यात येतो. मात्र खंडणीचे वाढते गुन्हे पोलिसांसाठी चिंतेचा विषय बनू लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या वसई विरार तसेच मिरा भाईंदर शहरात अनेक मोठमोठे प्रकल्प येत आहेत. बांधकांम व्यवसाय वाढत आहे. अशा वेळी त्यांना धमकावून खंडणी मागण्याचे प्रकार वाढले आहेत. खंडणीच्या वाढत्या तक्रारीमुळे उद्योजक, व्यावसायिक यांच्यात घबराट पसरली आहे. महिन्याला सरासरी खंडणीचे ३ ते ४ गुन्हे दाखल होत असतात. कुख्यात गुन्हेगारी टोळीचा सहभागही वाढला होता. त्यातून प्राणघातक हल्ले करणे, हत्या करणे, अपहरण करणे आदी घटना वाढल्या होत्या. त्यामुळे अशा गुन्ह्यांचा तपास करणे, खंडणीखोरांना आळा घळण्याची आवश्यकता निर्माण झाली होती.

यासाठी पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी खंडणी विरोधी पथकाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. हा खंडणीविरोधी कक्ष गुन्हे शाखेच्या अखत्यारित असणार आहे. काशिमिरा येथील वाहतूक पोलीस ठाण्याजवळ या कक्षाला जागा देण्यात आली आहे. या शाखेसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल राख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ३ अधिकारी आणि १२ कर्मचारी या विभागात नियुक्त करण्यात आले आहेत. शहरात व्यावसायिक, उदद्योजक कंत्राटदार यांना खंडणी साठी धमक्या देण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढले होते. यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यासाठी खंडणी विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त ( गुन्हे) मिलिंद बल्लाळ यांनी दिली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anti extortion squad set up at mira bhayandar police commissionerate after threat to businessman increase zws