पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे पालिकेचे निर्देश

सुहास बिऱ्हाडे

वसई : वसई-विरार महापालिकेतील तोतया डॉ. सुनील वाडकर याची नियुक्ती खुद्द त्याच्या पत्नीच्या एजन्सीमधून झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पालिकेच्या सेवेत आल्यानंतर लगेच वाडकर मुख्य वैद्यकीय अधिकारी बनला आणि स्वत:च्याच सहीने खासगी रुग्णालयाला परवानगी दिली आहे. आता पालिकेने त्याच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना वाडकर हा वसईत वैद्यकीय व्यवसाय करून रुग्णालय चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने त्याला अटक केली होती. २००७ ते २०१३ या काळात तो वसई-विरार महापालिकेच्या आऱेग्य विभागात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्यामुळे अशा तोतया डॉक्टरची नियुक्ती कुठल्या आधारावर करण्यात आली असा सवाल उपस्थित झाला होता. पालिकेने याचा तपास घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. २००७ मध्ये वसई नगरपरिषद असताना डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर नेमले जात होते. हा ठेका डॉ. आरती वाडेकर यांच्या एजन्सीला मिळाला होता. त्यांनी आपल्याच पतीला या ठेक्याद्वारे पालिकेच्या सेवेत घेतले होते, अशी माहिती पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी दिली. दोन वर्षांत वसई-विरार महापालिकेची स्थापना झाली आणि  वाडकर मुख्य वैद्यकीय अधिकारी बनला. २०१३ ला पालिकेने हा ठेका रद्द करून स्वत: नियुक्ती करण्याचे ठरवले तेव्हा बिंग फुटण्याच्या भीतीने वाडकरने राजीनामा देऊन गाशा गुंडाळला असे आयुक्तांनी सांगितले. आम्ही या प्रकरणात त्याच्या पत्नीच्या एजन्सीची फाईल तपासत आहोत. तिने महापालिकेची आणि शासनाची फसवणूक केल्याचे सिद्ध झाल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आम्ही पोलिसांनी दिले आहेत, असेही गंगाथरन डी यांनी सांगितले.

नियुक्ती होताच स्वत:च्याच रुग्णालयाला परवानगी

वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागप्रमुख असताना  वाडकर याने पत्नी आणि स्वत:च्या नावाने विरार येथे ‘हायवे’ हे रुग्णालय उभारले. या रुग्णालयाला खुद्द त्यानेच  २ एप्रिल २०१३ रोजी परवानगी दिल्याचे उघड झाले आहे. वाडकर याच्याकडे पदवी नव्हती तसेच त्याची पत्नी दंतचिकित्सक होती. तरीदेखील त्यांनी ट्रॉमा केअर रुग्णालय बेकायदा सुरू ठेवले होते. सुनिल वाडकर याच्यावर यापूर्वी एका डॉक्टर तसेच एका कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याचे दोन स्वतंत्र गुन्हे विरार आणि वालीव पोलीस ठाण्यात दाखल आहेत. सध्या तो विरार पोलीस ठाण्याच्या कोठडीत असून शनिवापर्यंत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. १४ वर्षांनंतर या तोतया डॉक्टरचे बिंग फुटले आहे.