वसई: वसई भाईंदर रोरो सेवेला जोरदार प्रतिसाद मिळत असताना आता पुरातत्व विभागाने रोरो च्या रस्त्याला हरकत घेतली आहे. या रोरो सेवेच्या जेटीला जाणारा रस्ता वसई किल्ल्यातून जात असल्याने वसई किल्ल्यात वाहनांची वर्दळ प्रचंड प्रमाणात वाढली आहे. यामुळे किल्ल्याचा ऐतिहासिक ठेवा धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुरातत्व खात्याने हरकत घेतली असून तसे लेखी पत्र महाराष्ट्र सागरी मंडळाला दिले आहे.
महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे नुकतीच वसई भाईंदर रोरो सेवा सुरू करण्यात आली आहे. वसईवरून भाईंदरला अवघ्या १० मिनिटाता जाता येत असल्याने या रोरो सेवेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा… वहिनीची हत्या करणार्या दिराला जन्मठेप; वसई सत्र न्यायालयाचा निकाल
या रोरो च्या जेटीला जाण्याचा मार्ग हा ऐतिहासिक वसई किल्ल्यातून जातो. वसई किल्ला एक ऐतिहासिक ठेवा असून तो किल्ला पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतो. रोरो सेवा सुरू झाल्यापासून वसई किल्ल्याच्या मुख्य मार्गावरून वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहेत. मोठ्या संख्येने वाहने ही आता किल्ल्यात प्रवेश करू लागली आहे. त्यामुळे पुरातत्व खात्याने या रोरो सेवेच्या रस्त्याला हरकत घेतली आहे. या वाढत्या वाहनांच्या रहदारीमुळे किल्ल्याच्या भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
वाहने किल्ल्याच्या रस्त्यावर तासनतास उभी असतात.याचा परिणाम येथील ऐतिहासिक वास्तू वर होण्याची शक्यता आहे. यासाठी येथील वास्तूलाही धोका ही निर्माण होण्याची भीती पुरातत्व खात्याने व्यक्त केली आहे. रोरो साठी या भागातून वाहनांची वाहतूक करताना पुरातत्व विभागाची परवानगी घेणे गरजेचे होते मात्र तसे न करताच ही वाहतूक सुरू असल्याचे पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आले आहे. याबाबत पुरातत्व विभागाने महाराष्ट्र सागरी मंडळाकडे तक्रार केली आहे.
स्थानिकांचा मात्र रोरोला पाठिंबा
स्थानिकांनी मात्र या रोरो सेवेच्या रस्त्यामुळे किल्ल्याच्या पावित्र्याला बाधा येणार नसल्याचे म्हटले आहे. मुळात रोरो कडे जाणारा रस्ता हा किल्ल्याच्या डावीकडील बाहेरील भागातून आहे. त्यातही अवजड वाहने नाहीत. त्यामुळे किल्ल्याच्या वास्तूला कसलाच धोका नसल्याचे स्थानिक नागरिक दिलीप राऊत यांनी सांगितले. मुळ किल्ला उजव्या भागात असून तो सुरक्षित राहणार आहे. तर केंद्र शासनाचा प्रकल्प असताना पुरातत्व खात्याने आधीच हरकत का घेतली नाही, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते नितिन म्हात्रे यांनी केला आहे. मुळात वसई किल्ला हा दुर्लक्षित होता. रोरो सेवेमुळे किल्ल्याच्या पर्यटनाला चालना मिळेल, असे म्हात्रे यांनी सांगितले.
पुरातत्व विभागाच्या कायद्यानुसार त्या भागात प्रवेश करताना त्या विभागाची परवानगी घेणे गरजेचे आहे. तशी कोणतीही परवानगी घेतली नाही. यासाठी आम्ही याबाबत शासकीय स्तरावर तक्रार दाखल केली आहे. – कैलास शिंदे, पुरातत्व विभाग वसई