वसई : सोपारा येथील पुरातन बौद्ध स्तूपाच्या संवर्धनाचे काम अखेर पुरातत्त्व विभागाने हाती घेतले आहे. बौद्धस्तूपाचे पावित्र आणि महत्त्व कायम ठेवून सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. परंतु स्तूप परिसरात मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे झाली असून ती दूर करण्याची मागणी भाविकांनी केली आहे.
नालासोपारा पश्चिमेच्या सोपारा येथे अडीच हजार वर्षांपूर्वीचा बौद्ध स्तूप आहे. शूपार्पक (आताचे सोपारा) ही पूर्वी कोकण प्रांताची राजधानी होती. येथील बंदरातून व्यापार चालायचा. अडीच हजार वर्षांपूर्वी चंदनाचे व्यापारी आणि नंतर तथागत भगवान बुद्धाच्या धम्माने प्रेरित होऊन अरहंत पद प्राप्त झालेले बौध्द भिक्खू पूर्ण यांनी हे बौद्ध स्तूप बांधून भगवान गौतम बुद्धाच्या हस्ते त्याचे उदघाटन केले होते. त्यामुळे या स्तूपाला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. जगभरातील बौद्ध धम्माचे अनुयायी आणि पर्यटक या स्तूपाला भेट देण्यासाठी येत असतात. परंतु या स्तूपाची दुरवस्था झाली होती. पर्यटकांना साध्या सुविधादेखील मिळत नव्हत्या. वसईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी समिती, माजी महापौर रुपेश जाधव यांनी यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. बहुजन विकास आघाडीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या संचालिका तसेच पुरातत्त्व खात्याच्या अधीक्षकांकडे याबाबत पाठपुरावा झाल्यानंतर कामाला मंजुरी मिळाली होती. त्यानुसार सध्या स्तुपाच्या संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. स्तूपाच्या परिसरात पडझडीची डागडुजी करण्यात येत असून परिसरातील झाडे काढून तो स्वच्छ करण्यात येत आहे. पर्यटकांना बसण्याची आसने, प्रसानधगृह आदी सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे.
परिसरातील अतिक्रमणांवर कारवाईची मागणी
स्तूपाच्या परिसरात अनेक ठिकाणी अतिक्रमणे झालेली आहेत. टपऱ्या आणि बेकायदा बांधकामे झालेली आहेत. ही संपूर्ण जागा पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसराचा विकास करून जागतिक दर्जाचे केंद्र बनविण्यासाठी या अतिक्रमणांना आताच आळा घालण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. स्तूपाचे संवर्धन होत असताना परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशी मागणी पुरातत्त्व खात्याकडे करण्यात आली आहे.