पालघर / वसई : वसई किल्ला ते भाईंदर दरम्यान रो रो सेवा सुरू करण्यासाठी अडथळा असणाऱ्या वसई जेटीचे काम येत्या दोन दिवसात पूर्ण होणार असून फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून या दोन शहरांमध्ये रोरो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सागरी मंडळाने तयारी केली आहे. त्यामुळे दोन शहरांदरम्यान प्रवास करताना ३४.७ किलोमीटरचे अंतर कमी होणार असून त्यामुळे प्रवास वेळेत ५५ मिनिटांची बचत होणे अपेक्षित आहे.
महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई- भाईंदर दरम्यान रोरो सेवा कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने ६.०२ कोटी रुपयांचा खर्च मंजूर झाला असून या प्रकल्पांतर्गत भाईंदर येथील जेटीचे व जोड रस्त्याचे काम पूर्ण झाले होते. वसई किल्ल्याजवळ असणाऱ्या जुन्या जेटीच्या बाजूला नव्या जेटीचे काम हाती घेण्यात आले असून त्यावर अगोदर तयार केलेले प्रिकास्ट स्लॅब आणि बीम याद्वारे उभारणी करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून ते काम येत्या दोन दिवसात पूर्ण होईल असे महाराष्ट्र सागरी मंडळाचे कार्यकारी अभियंता तुषार पाटोळे यांनी सांगितले. आवश्यक चाचणीनंतर या दोन शहरांमधील रो रो सेवा फेब्रुवारीच्या १३ तारखेपासून सुरू करण्याचे प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा >>>वसई: आदिवासींचे दोन हजाराहून अधिक वनपट्टे मंजुरीच्या प्रतीक्षेत
रो रो सेवेकरिता बोट चालक (कंपनी ऑपरेटर) निश्चित झाला असून “जान्हवी” या बोटीमधून १०० प्रवासी व ३० वाहन ३.५७ किलोमीटरचे अंतर अवघ्या १५ मिनिटात पार करतील अशी अपेक्षा आहे. भाईंदर रेल्वे पूलाच्या जवळ रो रो सेवेचे दुसरे टोक आहे. या दोन शहरांमध्ये सद्यस्थितीत प्रवास करण्यासाठी ३८.२० किलोमीटर अंतर असून त्यासाठी सरासरी ७५ मिनिटांचा कालावधी लागत असून यामुळे प्रवाशांची ५० ते ५५ मिनिटांची बचत होईल अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा >>>वसई : बनायला गेला पोलीस, पण बनला चोर
ही सेवा सकाळी ६ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत नागरिकांच्या मागणीचा विचार करून वेळापत्रकानुसार सुरू राहणार असून जेटीलगत प्रवाशांसाठी प्रतिक्षालय, शौचालय तसेच तिकीट बुकिंग काउंटर उभारण्यात आले आहे. जेटीच्या तसेच प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उभारणी दरम्यान सीआरझेड नियमांचे पालन करण्यात आले असून दोन शहरांमधील प्रवास सुलभ होण्याच्या दृष्टीने पर्यटन विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.
उत्तर कोकणातील पहिली रोरो सेवा
पालघर जिल्ह्यात सुरू होणारी वसई भाईंदर ही पहिली रोरो सेवा टेंभीखोडावे (खारवडेश्री) ते अर्नाळा दरम्यान सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने प्रकल्प हाती घेतला आहे. या रो रो सेवेचा आनंद पर्यटकांना मिळणार असून त्यामुळे पालघर जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळेल असे महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.