वसई: आंतरराष्ट्रीय दर्जाच्या धर्तीवरील जलतरण तलाव अशी ख्याती असलेल्या विरारच्या जलतरण तलावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या जलतरणतलावातील पाण्यात चक्क स्मशानातील राख मिसळली जात आहे. या जलतरणतलावाशेजारी असलेल्या स्मशानभूमीमधून ही राख उडून पाण्यात पडत आहे. ही बाब समजतात येथे येणार्या नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी जलतलरण तलावात येणे बंद केले आहे. ही राख आरोग्यसाठी हानीकारक ठरत आहे.
विरार पूर्वेच्या फुलपाडा येथे वसई विरार महापालिकेने जलतरण तलाव उभारले आहे. हे जलतरण तलाव आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्याचा दावा पालिकेने केला आहे. या तलावात शहरातील अनेक नागरिक पोहण्यासाठी व पोहण्याचा सराव करण्यात येत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या तलावाचे पाणी दूषीत असल्याचे तसेच पाण्याची चव वितित्र लागत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. या तलावातील पाण्यात सतत धूळ साचत होती तसेच पाणी दूषीत होऊ लागले होते, असे सुरवातीला वाटले होते. मात्र नंतर याचे धक्कादायक कारण समोर आले.
या जलतरणतलावाला लागून स्मशानभूमी आहे. त्या स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. अंत्यसंस्कारानंतर तयार होणारी राख आहे ती हवेद्वारे थेट जलतरण तलावात येत असल्याचे उघड झाले आहे. स्मशानभूमीमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर धूर जाण्यासाठी आवश्यक असणारी चिमणीही नाही त्यामुळे धूर देखील परिसरात पसरत असतो. या जलतरण तलावाला पुरेसे संरक्षण नाही, जी भिंत उभारली आहे ती सुद्धा अपुरी आहे त्यामुळेच ही राख हवेद्वारे सहज तलावाच्या पाण्यात पडत असल्याचे येथे पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी सांगितले आहे.
राख पाण्यात पडत असल्याने पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पोहताना अनेकदा पाणी तोंडात जाते. त्यामुळे हे दूषित पाणी नागरिकांच्या तोंडात गेले तर त्यांचे आरोग्य बिघडू शकते. यासाठी महापालिकेने या तलावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे. जलतरण तलावाला पुरेसे संरक्षण नाही. त्यामुळे बाजूच्या स्मशानभूमीतील हवेद्वारे जलतरण तलावात येते. हा गंभीर प्रकार असल्याचे राज दसोनी यांनी सांगितले आहे.
त्वरीत कारवाई करण्याचे निर्देश
हा प्रकार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांना सांगितले असता त्यांनी तात्काळ शहर अभियंता प्रदीप पाचंगे यांना घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रकार गंभीर आहे. नेमकी काय समस्या आहे त्याची पाहणी शहर अभियंता करती आणि त्यानुसार आवश्यक उपाययोजना केल्या जातील अशी माहिती पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिली.