लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

पनवेल/वसई : बहुचर्चित अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील दोषी बडतर्फ पोलीस अभय कुरुंदकर याच्या शिक्षेचा अंतिम निर्णय आता सोमवार २१ एप्रिल रोजी होणार आहे. कुरुंदकरला दोषी ठरविल्यानंतर शुक्रवारी पनवलेच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तीवाद आणि बिद्रे कुटूंबियांचे मत ऐकल्यानंतर न्यायाधीश पालदेवार यांनी अंतिम निकाल राखून ठेवला आणि पुढील शिक्षेची सुनावणी २१ एप्रिल रोजी देण्याचे जाहीर केले.

दिड वर्षे बेपत्ता असलेल्या सहाय्यक पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांची ११ एप्रिल २०१६ रोजी हत्या करण्यात आली होती. भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्याचा तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याने अश्विनी यांची हत्या करून आपल्या साथादीरांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. या प्रकरणी अभय कुरुंदरकर, त्याचे दोन साथीदार कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांच्यावर पनवलेच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोषी ठरवले होते.

शुक्रवारी. पनवलेच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात शिक्षेसंदर्भातील सुनावणी झाली. या प्रकरणातील न्यायालयातील कामकाज दुपारी तीन तास चालले. या दरम्यान न्यायालयाने बिद्रे कुटूंबियांची बाजू ऐकून घेतली. सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी कुरुंदकर याला फाशीची शिक्षा सूनावण्याची मागणी केली. परंतु आरोपीचे वकिल विशाल भानूशाली यांनी परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे यापूर्वी इतर न्यायालयाने सूनावलेल्या अंतिम निकालांच्या आदेशाची प्रत न्यायालयात सादर केली. दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तीवाद आणि बिद्रे कुटूंबियांचे मत ऐकल्यानंतर न्यायाधीश पालदेवार यांनी अंतिम निकाल राखून ठेवत पुढील सुनावणी २१ एप्रिलरोजी करु असे जाहीर केले.

फाशीची शिक्षा व्हावी- अश्विनी यांच्या मुलीची मागणी

शुक्रवारी न्यायाधीश पालदेवार यांच्या न्यायालयात बिद्रे यांचे पती, मुलगी, भाऊ आणि वडील यांचे सुद्धा मत नोंदवून घेण्यात आले. मयत अश्विनी बिद्रे यांची मुलगी सध्या अकरावी इयत्तेत शिकते. न्यायधीश पालदेवार यांनी ‘तू आईला शेवटचे कधी पाहीले? असे विचारल्यावर संपुर्ण न्यायालय काही सेकंदातच स्तब्ध झाले होते. तब्बल १० वर्षे ती तीच्या आईला या हत्याकांडामुळे बघू शकली नाही. मागील सात वर्षे न्यायालयात आणि त्यापूर्वी न्याय मिळण्यासाठी वडील झटत असल्याचे तिने सांगितले. आईचे जाणे आणि वडिलांच्या जिवासाठी वाटणा-या धोक्याविषयी तीने न्यायालयासमोर चिंता व्यक्त केली. समाजासाठी आई पोलीस दलात काम करत होती. आईला अखेरचा न्याय मिळविण्यासाठी तीच्या मारेक-यांना शिक्षा होणे गरजेचे असल्याचे तिने सांगतिले. पोलिसांकडून झालेल्या दिरंगाईविषयी तिने संताप व्यक्त केला. कुरुंदकरसह सर्व दोषींना फाशी व्हावी अशी मागणी तिने केली.

मी माजी सैनिक आहे. मी मुलगा व मुली असा भेदभाव न करता एकसारखे शिक्षण दिलंय. तीच्या साथीदाराने तिची हत्या केली आहे. त्या मारेक-याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी अश्विनी यांचे वडील जयकुमार बिद्रे यांनी न्यायालयापुढे केले. मी व माझ्या बहिणीने खडतर परिश्रम करून शिक्षण घेतले आहे. वेगवेगळ्या स्तरावर या प्रकरणातील आरोपींना वाचविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे पोलीस अधिकारी असलेल्या बहिणीला न्यायासाठी झटावे लागत असणे ही निंदनीय बाब आहे अश्विनी यांचे भाऊ आनंद बिद्रे यांनी सांगितले.

पोलिसांवर विश्वासार्हतेला तडा

बिद्रे कुटूंबियांसह सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी बाजू मांडताना पोलिसांच्या कार्यपध्दतीवर टिका केली. अश्विनी बिद्रे यांची हत्या करणारा अभय कुरुंदकर हा जेवढा या प्रकरणात दोषी आहे तेवढेच पोलीस दोषी असल्याचे सांगितले. एफआयआर करून घेण्यास टाळाटाळ, तपासात केलेला हलगर्जीपणा हे सर्व अभय कुरुंदकर याला वाचविण्यासाठी केलेल्या कटाचा भाग असल्याचे सांगितले. अश्विनी यांचे भाऊ आनंद यांनी या प्रकरणात पोलिसांनी त्याच्या साथीदाराची हत्या केल्यामुळे समाजामध्ये पोलिसांच्या विश्वासहर्तेला तडा गेल्याचे मत नोंदवले.