वसई: मागील चार ते पाच दिवसांपासून नायगाव-उमेळा फाटा रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे, परंतु हे डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नायगाव पश्चिमेतून नायगाव स्थानक ते उमेळा फाटा हा रहदारीचा रस्ता आहे. मागील काही महिन्यांपासून त्याची अवस्था बिकट आहे. ठिकठिकाणी खडय़ांचे साम्राज्य आहे. या रस्त्याच्या नूतनीकरणाची मागणी नागरिकांनी केली होती. भाजपाचे जिल्हा सचिव मुकुंद मुळय़े यांच्यातर्फे पत्रव्यवहारही करण्यात आला होता. त्याच अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने या आठशे मीटर लांबीच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतले. दिसायला रस्ता गुळगुळीत दिसत आहे, परंतु प्रत्यक्षात हे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे आहे. केवळ एकाच थराचे डांबरीकरण केले आहे. पावसाळा सुरू होताच ते पुन्हा उखडून रस्त्याची अवस्था बिकट होईल, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
वसईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता अश्विनी भोसले याविषयी म्हणाल्या, रस्ते दुरुस्तीचे काम आवश्यकतेनुसार करण्यात येत आहे. जेथे कमी प्रमाणात रस्ता खराब आहे, तेथे एक थर आणि जिथे जास्त खराब आहे तिथे दोन थरांचे डांबरीकरण केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा