वसई : नाताळ सणापासून सुट्ट्या सुरू झाल्याने वसईच्या किनारपट्टीवरील रिसॉर्ट, हॉटेल्स आणि कॅफे गजबजू लागले आहेत. मात्र येथे येणार्‍या ग्राहकांना हॉटेल्स मधून बेकायदेशीररित्या मद्य पुरवले जात आहे. याशिवाय समुद्रकिनार्‍यावर सार्वजनिक ठिकाणी बसून मद्यपान केले जात आहे. या बेकायदेशीर मद्यविक्री विरोधात वसई तालुका हॉटेल असोसिएशनने तक्रार करूनही कारवाई करण्यात आलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसईच्या पश्चिम किनारपट्टीवर पर्यटक येत असतात. सध्या नाताळ सणानिमित्ताने सलग सुट्टया असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. परंतु या परिसरात असलेल्या रिसॉर्ट, हॉटेल्स आणि कॅफे मधून पर्यटकांना बेकायेदशीरपणे मद्य पुरवले जाते. अनेक जणांकडून समुद्रकिनार्‍यावरच मद्य पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे. या अनधिकृत मद्यविक्रीमुळे वसई विरार परिसरातील परवानाधारक मद्य विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. हे धाबे आणि हॉटेल्स कोणत्याही अबकारी, वस्तू सेवा कर (जीएसटी), मूल्यवर्धीत कर (व्हॅट) आणि इतर सरकारी शुल्क भरत नाहीत, परिणामी सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असतो.

हेही वाचा : शहरबात : समस्यांच्या जाळ्यात मच्छीमार…

या बेकायदेशीर मद्यविक्रीवर कारवाई करण्याची लेखी मागणी वसई तालुका हॉटेल असोसिएशनने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांकडे केली होती. मात्र थातूर मातूर कारवाईच्या पलिकडे काहीच ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप हॉटेल असोसिशएनशने केला आहे. आजही सर्रास मद्यविक्री सुरू असल्याची माहिती वसई तालुका हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी विहंग म्हात्रे यांनी दिली. आम्ही वारंवार स्थानिक उत्पादन शुल्क विभागापासून मंत्र्यांपर्यंत तक्रारी केल्या आहेत. परंतु हा प्रकार बंद झालेला नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : वसई : अल्पवयीन भावंडांचे अपहरण करून मागितली १० लाखांची खंडणी, पोलिसांनी केली सुखरूप सुटका

उत्पादनशुल्क विभागाच्या अधिकार्‍यांवर वसुलीचे आरोप

या प्रकारात मोठ्या प्रमाणात उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीसांचे संगनमत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. निरीक्षक बाळाासाहेब पाटील हे त्यांच्या खाजगी सहाय्यक (झिरो नंबर) हिलरी यांच्या बरोबर मिळून येथील अनधिकृत धाबे व हॉटेल व्यवसायिकांकडून मोठ्या प्रमाणात हप्ता वसूल करत आहेत. यामुळे येथील धंदे बंद होत नाही, असा आरोप संघटनेचे अध्यक्ष नागराज शेट्टी यांनी केला आहे. पाटील यांची बदली करून त्यांना निलंबित करण्याची मागणी देखील संघटनेने केली आहे. राजोडी, नवापूर या समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावर धाबे आणि रेस्टॉरंट उघडले आहेत. तेथे विनापरवाना मद्य विक्री केली जाते किंवा लोकांना स्वतःचे मद्य आणून पिण्यास परवानगी दिली जाते. याचा परिणाम अधिकृत परमिट रूम मधील व्यवसायावर होत असल्याचेही संघटनेने सांगितले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At vasai beach illegal liquor selling liquor parties on the beach excise and police department neglects css