वसई: वसई मध्ये पुन्हा एकदा एटीएम केंद्र लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. वसई पश्चिमेच्या बाभोळा येथे असलेल्या एसबीआय बँकेचे एटीएम लुटण्याचा प्रयत्न मध्यरात्री झाला. मात्र यंत्र फोडता न आल्याने चोरांनी फळ काढला.वसई पश्चिमेला बाभोळा येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम केंद्र आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरांच्या एक टोळीने या एटीएम केंद्रात शिरून यंत्र फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना एटीएम यंत्र फोडता आले नाही. दरम्यान, एटीएम केंद्रांमध्ये असलेल्या सुरक्षा यंत्रणेतून धोक्याची सूचना देणारा अलार्म वाजला. त्यामुळे चोर सावध झाले आणि त्यांनी तिथून पळ काढला. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात चार अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे
मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास ही घटना घडली. आम्हाला बँकेने उशिरा कळवले होते. आरोपी वाहनांतून आले होते. या प्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला असून तपास करत असल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली. आरोपींच्या शोधासाठी सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे.एटीएम केंद्र फोडण्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. माणिकपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एपीआय सचिन सानप यांचे एक पथक या आरोपींचा शोध घेत आहे.