वसई- वसई विरार महापालिकेने रिकाम्या शहाळ्यांपासून अनोख्या पद्धतीने आकर्षक भेटवस्तू तयार केली आहे. या शहाळ्यांना बाहेरून रंगवून आत माती आणि रोप टाकून ही भेटवस्तू तयार करण्यात आली आहे. अशा प्रकारे नैसर्गिक भेटवस्तू तयार करण्याचे काम महिला बचत गटांना देण्यात येणार आहे. याशिवाय पालिकेच्या कार्यक्रमातील पाहुण्यांचे स्वागत ही नैसर्गिक भेटवस्तू देऊन केली जाणार आहे. यामुळे पर्यावरणाचेही संवर्धन होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहाळ्यातील पाणी शरिराला उपयुक्त असते. मात्र ते पाणी पिऊन झाल्यावर रिकामे झालेले शहाळे ही मोठी समस्या असते. या शहाळ्यांचा (नारळाचे टरफलं) कचरा जमा होतो आणि मग तो कचराभूमीत टाकावा लागतो. मात्र याच रिकाम्या शहाळ्याचा अभिनव पद्धतीने वापर करण्याची संक्लपना पालिकेच्या उपायुक्त चारूशिला पंडित यांनी मांडली. रिकाम्या शहाळ्यावर रंगाने आकर्षक चित्र काढली आणि त्यात माती तसेच रोप टाकण्यात आले. यामुळे टाकाऊ वस्तूपासून आकर्षक नैसर्गिक भेटवस्तू तयार झाली. हा प्रकार सर्वांना आवडला. नुकत्याच झालेल्या कला क्रीडा महोत्सवात या शहाळ्यांपासून तयार केलेल्या भेटवस्तूंचे सादरीकरण करण्यात आले. त्याला सर्वांनी दाद दिली. आता पालिकेने शहाळ्यांपासून भेटवस्तू तयार करण्याचे काम महिला बचत गटांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या महिलांनादेखील रोजगार मिळणार आहे. याशिवाय पालिकेच्या कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ न देता शहाळ्यांपासून तयार केलेल्या भेटवस्तूने केले जाणार आहे.

हेही वाचा – वसई : कुख्यात टोळीचा पोलिसांवर हल्ला, ६ पोलीस जखमी

याबाबत माहिती देताना पालिकेच्या उपायुक्ता डॉ चारूशिला पंडित यांनी सांगितले की, शहाळे हे टणक असतात. त्यावर रंगवल्यास त्याला शोभा येते. मात्र केवळ ते शोभिवंत न राहता त्याचा वापर व्हायला हवा यासाठी रिकाम्या शहाळ्यात माती टाकून रोप लावले. यामुळे टाकाऊ शहाळ्यापासून छान भेटवस्तू तयार झाली. त्याला आम्ही ‘‘नॅचरल कोकोनट प्लांटर’ असे नाव दिले. ते घरात, बागेत शोभिवंत वस्तू म्हणून ठेवता येते. त्यात रोप असल्याने जमिनीत सहज विघटन होऊ रूजते. यामुळे टाकाऊ वस्तूपासून केवळ टिकाऊ नाही तर शोभिवंत भेटवस्तू तयार झाली आहे.

हेही वाचा – पालिकेतील १२२ कोटींचा ठेकेदार घोटाळा; पाच वर्षांपासून चौकशी रखडली

रिकाम्या शहाळ्यांना आपल्या कल्पनाशक्तीने हवे तसे रंगवून चित्रे काढता येतात. पालिकेने सध्या शहाळ्यांवर विविध सामाजिक संदेश देणारी चित्रे काढली आहेत. या संकल्पनेचा प्रसार करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये शहाळे रंगवून भेटवस्तू तयार करण्याची स्पर्धादेखील आयोजित केली जाणार आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attractive gifts from coconut shell a unique concept of vasai virar municipal corporation ssb
Show comments