२०२२ मधील वाहन चोरीच्या ५२५ गुन्ह्यांची उकल नाही

वसई : वसई-विरार आणि मीरा-भाईंदर शहरांत दिवसाला सरासरी दोन वाहनांची चोरी होत आहे. २०२२ या वर्षांत आयुक्तालयात तब्बल ८४४ वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील ४६१ गुन्ह्यांची उकल झालेली नाही. वाढत्या वाहन चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण  आहे. शहरातील नागरिकांमध्ये वाहन खरेदी वाढत आहे. दुचाकीबरोबर चारचाकी वाहनांची खरेदी मोठय़ा प्रमाणावर होत आहे. सुलभ वाहन कर्ज उपलब्ध असल्यामुळे अनेक कुटुंबे आता चारचाकी वाहने घेऊ लागली आहेत.

 एकीकडे वाहनांची संख्या वाढत असताना दुसरीकडे वाहन चोरीचे प्रमाणही वाढू लागले आहे.  २०२२ या वर्षांत ८४४ वाहन चोरीचे गुन्हे दाखल झाले. त्यापैकी केवळ ३१९ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.  २०२१ मध्येदेखील वाहन चोरीच्या ८६९ घटना घडल्या होत्या. त्यातील ३१९ गुन्ह्यांची उकल झाली होती वाहन चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी गस्ती वाढविल्या असून शहरात अधिकाधिक संख्येने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. 

वाहन चोरांच्या अनेक टोळय़ा पोलीस आणि गुन्हे शाखेने पकडल्या आहेत. मात्र तरीदेखील वाहन चोरीच्या नवनवीन टोळय़ा सक्रिय होत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.   अनेकदा महाविद्यालयीन तरुण मौजमजेसाठी वाहन चोरी करतात आणि नंतर ते निर्जन ठिकाणी सोडून देतात. अनेक नशेबाज वाहनातील सुटे भाग काढून विकण्यासाठी वाहन चोरी करत असतात. त्यामुळे अशा वाहन चोरांना पकडणे पोलिसांना आव्हान ठरले आहे.

सर्वाधिक चोरी दुचाकींची

वाहन चोरीच्या घटनांमध्ये सर्वाधिक चोरी ही गिअर नसलेल्या दुचाकींची होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दुचाकी बनावट चावीने किंवा तांत्रिक चलाखीने चोरणे सोपे असते. ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसतील अशा ठिकाणी उभी केलेली वाहने मोठय़ा प्रमाणावर चोरली जातात. त्यामुळे पोलिसांनी वाहने उभी करताना निर्जन स्थळी उभी न करणे, शक्यतो सीसीटीव्हीच्या परिसरात ठेवणे, दुचाकींना हॅण्डल लॉक करणे आणि इमारतीच्या बाहेर उभी न करता इमारतीच्या आत वाहने उभी करावीत अशा सूचना दिल्या आहेत.

Story img Loader