भाईंदर :-मिरा रोड येथे एका धार्मिक कार्यक्रमात मोठा गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. या कार्यक्रमा दरम्यान धर्मांतर केले जात असल्याचा आरोप बजरंग दलाकडून करण्यात येत आहे. या कार्यक्रमा दरम्यान झालेल्या गोंधळामुळे पोलिसांनी जवळपास चाळीस जणांना ताब्यात घेतले होते. मिरा रोड येथील एस.के.स्टोन परिसरात असलेल्या सेंटर पार्क सभागृहात शनिवारी एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा >>> वसई : वाहन विक्रेते व गॅरेज वाल्यांकडून रस्ते गिळंकृत, रस्त्यावरच वाहन विक्रीचा बाजार व दुरुस्ती; वाहतुकीला अडथळे
यात ख्रिस्ती धर्मात काही जणांचे धर्मांतर करण्यात येणार असल्याची माहिती बजरंग दल संघटनेला मिळाली होती.त्यामुळे सकाळीच काही कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी जाऊन गोंधळ घातला.काही वेळातच मिरारोड येथे पोलीस दाखल झाले.मात्र पोलिसांना देखील कार्यक्रमात प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी फौजफाटा पाठवून जवळपास ४१ जणांना दुपारी साडेतीनच्या सुमारास ताब्यात घेतले.त्यानंतर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चौकशी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. तर याबाबत सखोल तपास करण्यात येत असल्याची माहिती गायकवाड यांनी लोकसत्ताला दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार एका बेंगलोर मध्ये राहणाऱ्या इसमाने या सभागृहाची नोंदणी केली असल्याची माहिती समोर आली आहे.
धर्मांतर होत नसल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण
मिरा रोड येथे होत असलेल्या या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ‘यहोवा’ या संस्थेने केले होते.तीन दिवसीय संमेलनात राज्य भरातील मराठी भाषिक नागरिकांना सहभाग घेतला होता.मात्र यात कोणतेही धर्मांतर करण्याचा प्रकार नसल्याची प्रतिक्रिया संस्थेचे प्रवक्ता मुकेश गायकवाड यांनी दिली आहे.