भाईंदर:- २२ जानेवरीला आयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि मूर्ती प्रतिष्ठापना या पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर शहरात या दिवशी मांस विक्री न करण्याचे आवाहन मीरा भाईंदर महापालिकेकडून दुकानदारांना करण्यात आले आहे. याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे.
आयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन आणि मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर शहरातील वातावरण रामाच्या भक्तीत विलीन झाले आहे. यात गृहसंकुलांमधील इमारतींना आकर्षक विद्युत रोषणाई, भगवे झेंडे, प्रवेशद्वारावर कमानी आणि कंदील लावण्यात आलेले असून त्याचबरोबर याठिकाणी दररोज रामाची आरती, भजन आणि महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
हेही वाचा – आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक फरार, हवालदाराला १५ लाखांची लाच घेताना अटक
हेही वाचा – विरार गोळीबार प्रकरणात ३ अटकेत, हत्येसाठी एक लाखांची दिली होती सुपारी
याशिवाय महापालिकेमार्फतदेखील शहरातील सर्वच धार्मिक स्थळाची स्वच्छता करून ४८ मंदिरांमध्ये रोषणाई लावण्यात आली आहे. त्यामुळे या दिवसाला एक पवित्र स्वरूप प्राप्त होणार असल्यामुळे यादिवशी मटण, चिकन आणि मांस विक्रीवर किमान एक दिवसीय बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सामाजिक संस्थानी पालिका आयुक्त संजय काटकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार २२ जानेवारी रोजी शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याने शहरतील सर्व आस्थापनांमधील मांस विक्रीची दुकाने बंद ठेवावी, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.