कल्पेश भोईर
वसई: मागील काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसाचा फटका हा वसईची सुप्रसिद्ध असलेल्या केळीच्या बागांना बसला आहे. केळीच्या झाडांची पाने गळून पडत नसल्याने झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर असून मोठा परिणाम हा उत्पादनावर होत आहे. सध्या वसईचा हरित पट्टा नष्ट होऊ लागल्याने ठरावीक ठिकाणीच केळीची लागवड केली जात आहे. त्यामध्ये नाले, उंबरगोठण, सागरशेत, सत्पाला, राजोडी, देवतलाव यासह इतर विविध भागांमध्ये केळीच्या झाडांची लागवड करण्यात येते. यंदाही अनेक शेतकऱ्यांनी केळीच्या झाडांची लागवड केली आहे, परंतु मागील काही दिवसांपासून शहरात सतत पाऊस सुरूच आहे. याचा परिणाम हा केळीच्या झाडांवर होऊ लागला आहे.
केळीच्या झाडांची मुळे कुजून जात आहेत, तर काही झाडांची पानेही गळून पडत आहेत. त्यामुळे केळीची झाडे मृत होऊन नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. केळीचे उत्पादन घेण्यासाठी पोषक वातावरण मिळत नसून केवळ पाऊसच काही दिवसांपासून कोसळत असल्याचे बागायतदार फरमिन परेरा यांनी सांगितले आहे. यंदाच्या वर्षी मी अडीच एकर जागेत अडीच हजार इतक्या केळीच्या झाडांची लागवड केली आहे. यातील बहुतांश झाडांची मुळे कुजून पाने गळून पडली आहेत. याचा मोठा परिणाम हा उत्पादनावर होणार असल्याचे परेरा यांनी सांगितले आहे.
बागायतदार हवालदिल
वसईची केळी ही कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता पूर्णत: नैसर्गिकरीत्या वाढविली जात असतात, त्यामुळे बाजारात याला चांगली मागणी असते. परंतु मागील दोन ते तीन वर्षांपासून बुरशीजन्य रोग, अवकाळी पाऊस, चक्रीवादळ अशा विविध प्रकारची संकटे निर्माण होऊ लागल्याने वसई पट्टय़ातील बागायतदार हवालदिल झाले आहेत. मागील वर्षे निर्माण झालेल्या तौक्ते वादळात हजारो केळीची झाडे ही आडवी झाली होती.
पाऊस हा सातत्याने सुरूच आहे. त्यामुळे केळीच्या झाडांची मुळेही कुजून त्याची पाने गळून पडत आहेत. त्यामुळे झाडे नष्ट होऊन केळीचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे व मशागत करण्यासाठी केलेला खर्चही वाया जाण्याची शक्यता आहे.
– फरमिन परेरा, शेतकरी उंबरगोठण वसई