वसई: वसई विरारमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने सुप्रसिद्ध असलेल्या अर्नाळा, राजोडी समुद्र किनाऱ्यावर वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाले आहे. बेकायदेशीर पणे केल्या जाणाऱ्या वाळू उपशामुळे समुद्रकिनाऱ्यांची धूप होऊन समुद्र किनारे खचत आहेत. त्यामुळे येथील पर्यटन धोक्यात आले आहे.
वसई पश्चिमेतील परिसरात विस्तीर्ण असे समुद्र किनारे आहेत. तसेच आजू बाजूचा परिसर हा फळबागा, झाडांमुळे निसर्गरम्य असल्याने वसई विरार शहर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. अर्नाळा, नवापूर, भुईगाव, राजोडी, सुरुची, कळंब, रानगाव हे समुद्र किनारे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मौज मज्जा करण्यासाठी या किनाऱ्यावर मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. यासाठी प्रशासनाने समुद्र किनारपट्टीवरील परिसर विकसित करून पर्यटनाला चालना देणे गरजेचे होते. परंतु ही पर्यटन स्थळे प्रशासनाकडून दुर्लक्षित होऊ लागल्याने या भागातील समुद्र किनाऱ्यांची दुर्दशा होऊ लागली आहे. त्यातच समुद्र किनाऱ्यांच्या भागात छुप्या मार्गाने अनिर्बंध वाळू उपसा करण्याचे प्रकार समोर येत आहेत. मागील काही दिवसांपासून अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावरील नवापूर व राजोडी येथील किनाऱ्यावर हजारो ब्रास वाळू उत्खनन करून चोरून नेली जात आहे. वाळू उपश्यासाठी होत असलेल्या उत्खननामुळे हळूहळू लाटांच्या तडाख्याने किनार पट्टीचा भाग खचून किनाऱ्यावर खड्डे तयार होत आहेत. त्यामुळे पर्यटक बुडून मृत्यू होण्याच्या घटनाही घडत आहेत.
हेही वाचा – वसई : नायगावमध्ये जागेच्या वादातून गोळीबार, ६ जण जखमी
समुद्र किनार पट्टीच्या भागात वाळू उपसा करण्यास कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना सर्रासपणे वाळू उपसा होत असतो. त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक जीवरक्षक जनार्दन मेहेर यांनी केला आहे. सतत हे प्रकार सुरू असतात, असाच प्रकार सुरू राहिला तर येथील किनारे नष्ट होण्याची शक्यता आहे असे येथील नागरिकांनी सांगितले आहे.
याबाबत मेहेर यांनी बंदर निरीक्षक महाराष्ट्र सागरी मंडळ, पोलीस उपायुक्त यांच्याकडे तक्रार करून वाळू उपसा करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्रशासन अपयशी
वसई विरारमधील समुद्र किनाऱ्यावर मॉर्निंग वॉकसाठी अनेक नागरिक जात असतात. याबरोबरच प्रत्येक वीकेंडला या भागामध्ये विविध परिसरातून हजारो पर्यटक येत असतात. ते पोहण्यासाठी समुद्रात उतरतात. भरतीच्या वेळेत पाण्यामुळे अंदाज न आल्यामुळे सदर खड्ड्यांमध्ये पडून दुर्दैवी घटना घडल्या आहेत. असे असतानाही वाळू उपशावर निर्बंध घालण्यास प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा – वसई : पोलिसांच्या भरोसा कक्षाने सावरले १ हजार संसार
समुद्र किनाऱ्याच्या भागात मंडळ अधिकारी, तलाठी यांचे पथक नियुक्त करून गस्त घातली जात आहे. यात वाळू उपसा करताना कोणी आढळून येतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू तसेच ज्यांच्या तक्रारी येतात त्यावर चौकशी करून कारवाई केली जाईल. – राजाराम देवकाते, निवासी नायब तहसीलदार वसई
वाळू उपशावर कारवाई
बेकायदेशीर पणे होणाऱ्या वाळू उपसा यावर कारवाई केली जात असल्याचा दावा वसईच्या महसूल विभागाने केला आहे. ज्या भागात वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी असतील अशा ठिकाणी सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. नुकताच खानिवडे येथील बंदरात १ सक्शन पंप जप्त केला आहे. याशिवाय कोपर येथे बेकायदेशीर रेती वाहतूक करणारे दोन ट्रक पकडण्यात आले आहेत. यात १० ब्रास वाळू होती. हे जप्त केलेले ट्रक कारवाईसाठी परिवहन विभागाकडे दिले जाणार आहेत अशी माहिती निवासी नायब तहसीलदार राजाराम देवकाते यांनी दिली आहे.