वसई: वसई विरार शहरात सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी पालिकेने विविध ठिकाणचे चौक सुशोभित करून त्याठिकाणी शिल्प, कारंजे, रोषणाई अशी साधने बसवून शहराचे सौंदर्य खुलवले होते. परंतु त्या चौकांची योग्य रित्या देखभाल होत नसल्याने बिकट अवस्था झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सुशोभित केलेल्या चौकांचे सौंदर्य मावळू लागले आहे.

वसई विरार शहरात विविध ठिकाणी चौक आहेत. मागील काही वर्षांपासून वसई विरार महापालिकेने शहराच्या सौंदर्यीकरण करण्यावर भर दिला आहे.त्याचाच एक भाग म्हणून पालिकेने शहरातील चौकांचे सुशोभिकरण केले होते. यात शहरातील विविध समाजाची ओळख दर्शविणारी शिल्प व त्याभोवती सजावट केली आहे. मात्र त्यानंतर संबंधित ठेकेदार व पालिकेचे प्रभागीय अधिकारी यांचे त्यांची देखभाल व स्थिती जाणून घेण्याकडे दुर्लक्ष झाले असल्याने त्यांची बिकट अवस्था बनू लागली आहे.

यात वसई पूर्वेतील वसंत सर्कल, वसंत नगरीतील परिसर एव्हरशाईन चौक, अग्रवाल सर्कल-नालासोपारा, आचोळे रोड  सर्कल, नालासोपारा पश्चिम पंचमुखी हनुमान मंदिर जवळ, पाटणकर पार्क सर्कल, कारगिल नगर, विराट नगर, मनवेलपाडा आणि छेडा नगर  शहरातील प्रमुख अनेक चौकांमध्ये उभारण्यात आलेली शिल्पे आणि कारंजे सध्या जीर्णावस्थेत आहेत.

अनेक शिल्पांना तडे गेले असून, कारंज्यांचे पाणी गढूळ झाले आहे. विद्युत रोषणाई बंद पडल्याने रस्ते रात्रीच्या वेळी अंधारमय होतात. तर दुसरीकडे या चौकांना बेकायदेशीर पणे जाहिरात फलक, शुभेच्छा फलक ही लावले जात असल्याने विद्रुपीकरण होऊ लागले आहे. या सर्व परिस्थितीमुळे शहराचे सौंदर्य मावळत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

ज्या ठेकेदाराने चौकांचे सुशोभिकरण केले त्यांच्यावर त्याची देखभाल करण्याची जबाबदारी ही सोपविली होती.  मात्र त्यांनी सुद्धा पाठ फिरवली असल्याने ही चौकांची अवस्था झाली आहे.पालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून त्याची निगा राखली जात नसेल तर एकप्रकारे इतका मोठा निधी वाया गेला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

पालिकेने तयार केलेले चौक स्वच्छ करून त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

शहरात ज्या ठिकाणी चौकांची दुरवस्था झाली आहे. विद्युत रोषणाई व इतर सुविधा बिघडल्या असतील तर त्यांची पाहणी करून दुरुस्त केले जाईल.

:- प्रकाश साटम, कार्यकारी अभियंता बांधकाम महापालिका 

कारंज्यातील गढूळ पाणी

शहरातील तयार केलेल्या चौकात कारंजे बसविले आहेत. त्यातून पाण्याचे हलके फवारे बाहेर पडत होते. आता तेच कारंजे धूळखात पडले आहेत. त्यात असलेले पाणी सुद्धा वेळोवेळी बदली न केल्याने गढूळ झाले आहे. तर काही ठिकाणी शेवाळ तयार झाला आहे. या साचलेल्या पाण्यातच डासांची उत्पत्ती होऊन नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सागर पाटील यांनी सांगितले आहे.

चौकांना अनधिकृत फलकांचा विळखा 

शहरातील सुशोभित केलेल्या चौकातच आता विविध ठिकाणी अनधिकृत पणे फलक लावण्याचे प्रकार सुरू झाले आहे. विशेषतः यात राजकीय पक्षाच्या फलकांचा समावेश आहे. या वाढत्या अनधिकृत फलकांमुळे चौकांचे विद्रुपीकरण होत आहे अशा जाहिरात फलकांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.