वसई: वसई पूर्वेच्या भालिवली येथे एका इसमावर मधमाश्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे मधमाश्यांनी मोठय़ा प्रमाणात डंख मारले असल्याने हा इसम जखमी झाला असून त्याला लागलीच तेथील कार चालकाने आपल्या कारमध्ये घेऊन दरवाजे बंद केल्याने सुदैवाने त्याचे प्राण वाचले.
महामार्गावरील भालिवली येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या दाट झाडीच्या जंगलात प्रसिद्ध वृंदावन टेकडी महादेव मंदिर आहे. या ठिकाणी सध्या भाविकांची रोजची रेलचेल वाढली असून निसर्गरम्य असल्याने इतरांचाही ओढा येथे वाढलेला आहे. या मंदिरात मंगळवारी भगीरथ हा नेहमीप्रमाणे पूजा करण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी काही भाविकांनी होमहवन केले होते. परंतु या मंदिराच्या वरील बाजूस असलेल्या झाडावर आग्या मधमाश्यांचे पोळे आहे. त्या ठिकाणी धूर जाताच मधमाश्यांनी त्या ठिकाणी पूजा करण्यासाठी आलेल्या व्यक्तीवर हल्ला चढविला. भगीरथ असे या व्यक्तीचे नाव असून त्यांच्या शरीरावर जागोजागी मधमाश्यांनी डंख मारून जखमी केले.
दरम्यान भगीरथ धावत पळत खाली महामार्गाकडे येत असताना भालिवलीतील एका कार चालकाने दरवाजा उघडून त्याला लागलीच आत घेऊन दरवाजा बंद केल्यामुळे भगीरथचे प्राण वाचले. त्याच्यावर नजीकच्या दवाखान्यात उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती स्थिर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bee attack bhalivali vasai dense forest vrindavan hill amy