कल्पेश भोईर
वसई : शिधावाटपात सुसूत्रता यावी यासाठी पुरवठा विभागाने पीओएस ( ई- पॉस) यंत्राद्वारे धान्य वाटपास सुरुवात केली आहे. मात्र बदलत्या काळानुसार ही यंत्रे अद्ययावत करण्यात न आल्याने शिधा धान्य वाटप करताना विविध अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.
धान्य वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी आणि खऱ्या गरजूंनाच धान्याचा लाभ मिळावा यासाठी पुरवठा विभागाने बायोमेट्रिक प्रणालीची मदत घेतली आहे. लाभार्थ्यांचा अंगठय़ाचा ठसा घेतल्यानंतरच धान्याचे वितरण केले जाईल. या दृष्टीने मागील तीन ते चार वर्षांपूर्वी प्रशासनाने पीओएस यंत्राच्या सहाय्याने शिधापत्रिकाधारकांची ऑनलाइन नोंदणी करून धान्य वितरीत करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच अनुषंगाने वसईच्या पुरवठा विभागाने शिधापत्रिकाधारकांची ऑनलाइन नोंदणी करून त्यांना धान्य वितरण केले जाऊ लागले आहे.
वसईच्या भागात १७९ इतकी शिधावाटप केंद्र असून प्रत्येक केंद्रात एक पीओएस यंत्र देण्यात आले आहे. या यंत्रावर मिळणाऱ्या धान्याची नोंदणी करून संबंधित शिधापत्रिकाधारक याच्या अंगठय़ाचा ठसा पीओएसवर घेऊन जवळपास १ लाख ३६ हजार इतक्या शिधापत्रिकाधारकांना धान्य दिले जाते. परंतु या पीओएस यंत्रणेत काही वेळा अनेक तांत्रिक त्रुटी निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे शिधावाटप करताना दुकानदारांनाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. काही केंद्रांवरील पीओएस यंत्र ही फारच जुनी झाली आहेत. तर काही यंत्रे ही अगदी धिम्या गतीने चालत आहेत. तर काही ठिकाणी नेटवर्क नसल्याने धान्य घेण्यासाठी आलेल्या लाभार्थीना ताटकळत उभे राहावे लागत आहे. नेटवर्कअभावी काही वेळा धान्य मिळविण्यासाठी रांगा लावूनही धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांमधून येत असतात. यासाठी पीओएस यंत्र अद्ययावत करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
यंत्रणा अद्ययावत करण्याची गरज
सध्या ४ जी आणि ५ जीचा जमाना सुरू झाला आहे. असे असतानाही धान्यपुरवठा करण्यासाठी वापरण्यात येणारी ही पीओएस यंत्रे अद्याप २ जीच्या नेटवर चालत आहेत. त्यामुळे धान्य वाटप करताना अनेक अडचणी निर्माण होऊन बराच वेळ वाया जाऊ लागला आहे. बदलत्या काळानुसार ही यंत्रेही अद्ययावत होणे गरजेचे आहे, तसे न झाल्याने धान्य वाटपात अडथळे निर्माण होत आहेत. लाभार्थींचा अंगठा हा पीओएस यंत्रावर घेतला जातो. आधार कार्डशी संलग्न होण्यास काही सेकंद वेळ असतो, मात्र नेटवर्क नसल्याने विहित वेळेत काम पूर्ण होत नसल्याने अडथळे येत आहेत.
शासनाच्या नियमानुसार पीओएस यंत्राद्वारे नोंद घेऊन शिधा वाटप केले जात आहे. काही ठिकाणी पीओएसमध्ये अडचणी येतात तेव्हा धान्य वितरण करण्यास अडथळे निर्माण होतात. याबाबत आम्ही वरिष्ठांना यंत्र अद्ययावत करण्याबाबत माहिती दिली आहे. यंत्र अद्ययावत झाल्यास धान्य वाटपाची प्रक्रियाही अधिक सुलभ होण्यास मदत होईल.-रोशन कापसे, पुरवठा अधिकारी, वसई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा