भाईंदर : भाईंदर पश्चिमेकडे उत्तन गावातील समुद्र किनाऱ्याजवळील भागातील कांदळवन नष्ट करून अनधिकृत पणे दर्गा उभारण्यात आली आहे. अनधिकृतपणे उभारण्यात आलेली दर्गा हटविण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

भाईंदर पश्चिमेकडे उत्तन गाव परिसर आहे. या परिसरात समुद्र किनाऱ्याजवळच्या भागात कांदळवन तोडून त्या ठिकाणी दर्गा उभारण्यात आला होता. हा दर्गा कोणत्याही प्रकारची परवानगी न घेताच अनधिकृत पणे उभारण्यात आला होता. राष्ट्रीय सुरक्षितेतच्या दृष्टीने घातक असलेल्या दर्ग्याची तक्रार भारतीय जनता पक्षाचे विधानसभा निवडणूक अध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष रवी व्यास यांनी गेल्यावर्षी तत्कालीन उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ठाणे जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त यांच्याकडे केली होती. त्यानंतर अपर तहसीलदार निलेश गौंड यांनी दर्गा समितीला दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यात यावे अशी नोटीस बजावली होती.

मात्र त्यानंतर यावर कोणतीच कारवाई झाली नाही. नुकताच झालेल्या अधिवेशनात ही आमदार निरंजन डावखरे यांनी देखील या दर्ग्याच्या संदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर देतानाअनधिकृतरित्या १ हजार २९० चौरस मीटर जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेला दर्गा हटविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या २० मे च्या आधीच हा दर्गाचे अनधिकृत बांधकाम हटविणार असल्याचे सांगत त्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना ही करण्यात आल्या आहेत.